बोलत नाही म्हणून तरुणीला उचलून पायरीवर आपटलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
By दत्ता यादव | Published: April 18, 2023 02:23 PM2023-04-18T14:23:39+5:302023-04-18T14:24:02+5:30
प्रकृती सुधारल्यानंतर दिली तक्रार...
सातारा : बोलत नाही याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटलं. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश तुकाराम गिरमे (वय २७, रा. कूस, ता. सातारा) व त्याच्यासोबत असलेला संकेत आणि धनाजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २३ वर्षांची असून, ती साताऱ्यातील एका कपड्याच्या दुकानामध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. ही तरुणी आणि तिचा मित्र दि. १६ रोजी रात्री साडेदहा वाजता एका अपार्टमेंटच्या तळ मजल्यामध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी तेथे संदेश गिरमे हा त्याच्या अन्य दोन मित्रांसमवेत तेथे आला. पीडित तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून त्याने काही एक न बोलता अचानकपणे तरुणीला पकडून जोराने बाजूला ढकलले.
त्यानंतर त्याने पीडितेच्या कानाखाली आणि नाकावर बुक्की मारली. यामुळे तिच्या नाकातून जखम होऊन रक्त येऊ लागले. एवढेच नव्हे तर संदेश गिरमे याने तरुणीच्या छातीवर लाथा मारून तिला उचलून पायरीवर आपटले. ‘तुला आता जिवे मारूनच टाकतो,’ असे म्हणत जवळ पडलेला लोखंडी राॅड तिच्या कपाळावर आणि डोक्यात पाठीमागून मारला. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली.
हा वाद सोडविण्यास मध्यस्थी झालेल्या पीडित तरुणीच्या मित्रालाही तिघांनी बेदम मारहाण केली. जखमी तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिने सोमवारी रात्री पावणेबारा वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संदेश गिरमे याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर खुनाचा प्रयत्न करणे तसेच विनयभंग, संगनमत करून मारहाण करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.
प्रकृती सुधारल्यानंतर दिली तक्रार...
पीडित तरुणीच्या कपाळावर आणि डोक्यात खोलवर जखमा झाल्या होत्या. डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.