Satara- मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीत वाहून गेली, शोधमोहीम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:40 PM2023-04-05T12:40:03+5:302023-04-05T12:42:14+5:30
दुसऱ्या दिवशीही तेजलचा थांगपत्ता लागलेला नाही
शिरवळ : नीरा नदीच्या पात्रात हात-पाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवार, दि. ३ रोजी दुपारी चार वाजता हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत घडली.
तेजल ऊर्फ तेजू आप्पासो साळुंखे (वय २३, रा. वरुड, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. भोर, जि. पुणे) असे नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे.
पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वेलवंडी नदी व नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याच्यासमवेत फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पाॅवर हाऊसमधून १६३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपात्रात तेजल साळुंखे ही हात-पाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली.
घटनास्थळी असणारा तिचा मित्र दिगंबर साळेकर याने भोर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर भोर आणि शिरवळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली; परंतु अंधार पडल्याने ती थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. ४ रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दिवसभर नदीपात्रात या तिन्ही टीमनी शोध घेतला;. परंतु दुसऱ्या दिवशीही तेजलचा थांगपत्ता लागला नाही.
शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलिस अंमलदार अप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे, नितीन महांगरे, आदी शोधमोहिमेत सक्रिय आहेत.
शोधमोहीम सुरूच राहणार...
हरतळी (ता. खंडाळा) या ठिकाणी तरुणी वाहून गेल्याचे समजताच पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्यासह भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया, ऋषिकेश जाधव, नीलेश खरमरे, आऊ देशमुख, सारंग शेटे, आदींचा शोधमोहिमेत सहभाग आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही ही शोधमोहीम सुरू ठेवली जाणार आहे.