साताऱ्यात हवालदारावर कोयत्याने वार! पोलिसांकडून धरपकड, तीनजण ताब्यात
By दत्ता यादव | Updated: July 28, 2024 13:59 IST2024-07-28T13:58:35+5:302024-07-28T13:59:51+5:30
ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

साताऱ्यात हवालदारावर कोयत्याने वार! पोलिसांकडून धरपकड, तीनजण ताब्यात
दत्ता यादव
सातारा: सातारा बसस्थाकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चाैकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरूण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर ते बाहेर आले. संबंधित तरूणांना त्यांनी हटकल्यानंतर तेथून दंगा करणारे तरूण निघून गेले. हवालदार दत्ता पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बसस्थानकाबाहेरच उभे होते. सुमारे पंधरा मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चाैघेजण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत.
या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी करून झोपडपट्टीत शोध मोहीम राबविली. त्यावेळी तीन युवक पोलिसांच्या हाती लागले. तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्यावर नऊ टाके
हवालदार दत्ता पवार यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसावरच कोयत्याने हल्ला झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. हल्लेखोरांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का, याची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.