नोकरीच्या आमिषाने साताऱ्यातील युवकाला २७ लाखांचा गंडा; बनावट सही, शिक्क्यानिशी कागदपत्रे पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:07 PM2023-02-14T18:07:36+5:302023-02-14T18:08:24+5:30
चारित्र्य पडताळणीसाठी मागितले पाच लाख
कऱ्हाड : ‘न्यूझीलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाला तब्बल २७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरवडे येथील दिलीप सदाशिव धोकटे या युवकाने फिर्याद दिली आहे.
डेव्हिड फ्रीज गेराल्ड व एडन झेवियर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरवडे येथील दिलीप धोकटे हा युवक सात वर्षांपासून नायजेरियातील कंपनीत ऑनलाइन पद्धतीने सप्लाय चेन मॅनेजर म्हणून काम करतो. विविध क्षेत्रांत काम करण्याची आवड असल्यामुळे त्याने एका वेबसाइटवर नोकरीसंदर्भाने त्याची वैयक्तिक माहिती टाकली होती. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दिलीपच्या मेल आयडीवर मेल आला.
त्यामध्ये न्यूझीलंडमधील एका कंपनीसाठी दिलीपला विचारणा करण्यात आली, तसेच कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी त्याला फोन आला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव डेव्हिड गेराल्ड असल्याचे सांगून त्याची मुलाखत घेतली. त्याला कंपनीचे जॉब लेटर आणि न्यूझीलंड सरकारच्या सही-शिक्क्यानीशी असलेले एम्प्लॉयमेंट परमिशन लेटरही पाठवले.
दरम्यान, डेव्हिड गेराल्ड या व्यक्तीने दिलीपला पुढील कार्यवाहीसाठी नवी दिल्लीत असलेल्या न्यूझीलंड परराष्ट्र दूतामध्ये एडन झेवियर या व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितले. संबंधिताशी संपर्क झाल्यानंतर त्या व्यक्तीने ही नोकरी न्यूझीलंड सरकारची कायदेशीर नोकरी असल्याचे भासवत ही नोकरी तुम्हालाच मिळणार, अशी खात्री दिली. त्यानंतर वेळोवेळी दिलीपला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तब्बल २७ लाख ८२ हजार रुपये ऑनलाइन पाठवले.
मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत संबंधितांकडून नोकरीबाबत टोलवाटोलवी होत असल्याने आणि वारंवार पैशांची मागणी केली जात असल्यामुळे दिलीपला संशय आला. त्याने नवी दिल्लीतील न्यूझीलंड उच्च आयोगाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथून त्याला न्यूझीलंड इमिग्रेशन कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दिलीपने त्याठिकाणी संपर्क केला असता अशी कोणतीही कार्यवाही न्यूझीलंड देशाकडून झाली नसल्याचे सांगण्यात आले.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिलीप धोकटे याने याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.
चारित्र्य पडताळणीसाठी मागितले पाच लाख
दिलीप धोकटे याने वेगवेगळ्या कारणासाठी संबंधितांना पैसे पाठवले. मात्र, १९ डिसेंबर २०२२ रोजी त्याला ई-मेल करून पोलिस चारित्र्य पडताळणीसाठी पाच लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. मात्र, दिलीपने यापूर्वी परदेश दौरा केल्यामुळे चारित्र्य पडताळणीसाठी केवळ शंभर रुपये खर्च येत असल्याचे माहिती होते. त्यामुळे शंका आल्याने त्याने चौकशी सुरू केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
कोणत्या कारणांनी उकळले पैसे?
व्हिसा फी, कामाची परमिट फी, पत्नीची व्हिसा फी, प्रवासी विमा, ड्रग्ज विरोधातील क्लिअरन्स फी, रिफंड प्रत्यावर्तन फी, न्यूझीलंडमध्ये बँक खाते काढण्याची फी, बँक खाते आरबीआयला लिंक करण्याची फी, परदेशात खाते काढण्याची एजंट फी, पैसे रिफंड करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची फी आणि काम करण्याचे परमिट सेक्युरिटी बॉण्ड फी अशा वेगवेगळ्या कारणास्तव आरोपींनी दिलीप याच्याकडून पैसे उकळले.