Satara: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वारास चिरडले, एक ठार, एकजण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:14 PM2024-07-22T16:14:18+5:302024-07-22T16:14:31+5:30
टायर फुटल्याने कार थांबली
कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण मार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला. तर अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे. आबईचीवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
दरम्यान, अपघातानंतर जागेवरच न थांबता मद्यधुंद चालकाने कार सुसाट पुढे नेली. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुपने बसथांब्यावर ग्रामस्थांनी कार अडवून चालकाला चोप दिला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. अपघातप्रकरणी कारचालकावर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदार अशोक संकपाळ (वय १८, रा. म्होप्रे), असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्र नरेंद्र माने (१९, रा. म्होप्रे, ता. कऱ्हाड) याच्यावर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक वसंत पवार (३९, रा. बैलबाजार रोड, शनिवार पेठ, कऱ्हाड), असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील केदार संकपाळ हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मित्र वीरेंद्र माने याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच ११ एई ३६५९) कऱ्हाडकडे येत होता. ते दोघेही आबईचीवाडी गावच्या हद्दीत आले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच ५० यू ५७५६) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, केदार व वीरेंद्र हे दोघेजण रस्त्यावरून दूरवर फेकले गेले. त्यामध्ये केदारचा जागीच मृत्यू झाला. तर वीरेंद्र गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर चालकाने कार न थांबविता तो सुसाट निघून गेला. सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुपने गावच्या हद्दीत बसथांब्यावर ग्रामस्थांनी ती कार अडवली. त्यानंतर अपघाताची माहिती कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. तर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
टायर फुटल्याने कार थांबली
अपघातग्रस्त कार सुसाट वेगात होती. आबईचीवाडीच्या हद्दीत दुचाकीला कारने धडक दिली. त्यावेळी दुचाकीचे कॅरेज तुटून ते कारच्या डाव्या बाजूच्या पुढच्या चाकात अडकले. हे कॅरेज टायरला घासल्यामुळे सुपने गावच्या हद्दीत कारचा टायर फुटला. त्यामुळे कार थांबली. आणि ग्रामस्थांनी कारला घेराव घातला, अशी घटनास्थळी चर्चा होती.