सातारा: मांड ओढ्यावरील पुलावरुन वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:02 PM2022-10-19T12:02:24+5:302022-10-19T12:35:51+5:30
शिरवळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून साकव पूल पाण्याखाली गेला होता.
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील मांड ओढ्यावरील पुलावरुन एक युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. अविनाश उर्फ पप्पू शिवाजी जगताप (वय २७, रा.केदारेश्वर काँलनी, शिरवळ ता.खंडाळा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना काल, मंगळवारी (दि.१८) राञीच्या दरम्यान घडली. आज, दुपारच्या सुमारास निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाना अविनाशचा मृतदेह सापडला.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अविनाश उर्फ पप्पू जगताप हा दुचाकीवरुन काही कामानिमित्त शिरवळ येथील सटवाई कॉलनी याठिकाणी निघाला होता. दरम्यान, शिरवळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून साकव पूल पाण्याखाली गेला होता. अविनाशला अंधार असल्याने व पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तो पुलावरुन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
याबाबतची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक युवकांच्या व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्यातून शोधकार्य राबविले. अंधार असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळी शोधकार्य उशिरा थांबविण्यात आली.
दरम्यान, आज, सकाळी पुन्हा शिरवळ पोलिसांकडून महाबळेश्वर ट्रेकर्स, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, स्थानिक मच्छिमार, शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्यातून शोधमोहिम सुरु करण्यात आली. दुपारच्या सुमारास निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना अविनाशचा मृतदेह हाती लागला.