अबब... साठ पोती कचरा गोळा!
By admin | Published: June 16, 2015 01:23 AM2015-06-16T01:23:07+5:302015-06-16T01:23:07+5:30
कास परिसराची स्वच्छता : कचराकुंड्या बसविण्याचे पालिकेचे नियोजन
सातारा : सध्या कास तलाव परिसरात पर्यटकांकडून विद्रूपीकरण होत आहे. पर्यटनासाठी येताना आपल्यासोबत आणलेल्या प्लास्टिक बाटल्या, जेवणाच्या पत्रावळ्या, पिशव्या तेथेच टाकून दिल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रविवारी पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून कास परिसरातून सुमारे ६५ पोती कचरा गोळा करण्यात आला. दरम्यान, कास परिसरात सिमेंटच्या कचराकुंड्या बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सारस यांनी दिली.
पर्यटक कास परिसरात वृक्षांची कत्तल करून पार्ट्या करत आहेत, कासचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसराची निगराणी करण्यात यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याचा गांभीर्याने विचार करून पालिकेने कास परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. नगराध्यक्ष सचिन सारस, अतिरिक्त मुख्याधिकारी आशिष लोकरे, अभियंता प्रभुणे, चव्हाण, मुख्याधिकाऱ्यांचे सचिव साखरे तसेच अनिल भोसले, विश्वास गोसावी, संदीप कांबळे, दुर्वास कांबळे या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
कास तलाव परिसरातील झाडाझुडपांत पर्यटकांनी केलेला कचरा अधिकाऱ्यांनी गोळा केला. यामध्ये मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, द्रोण, पत्रावळ्या, प्लासिक पिशव्या, ग्लास व इतर कचऱ्याचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी कास परिसरातून सुमारे साठ ते पासष्ठ पोती कचरा गोळा करून टेम्पोतून नेवून तो सोनगाव कचराडेपोत टाकण्यात आला. (प्रतिनिधी)