सातारा जिल्ह्यात बेचाळीस हजार जनावरांना ‘आधार’ टॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:30 PM2018-10-01T23:30:54+5:302018-10-01T23:31:00+5:30
योगेश घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आधार हा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरवा मानला जातो. ‘आधार’च्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येते. त्याचप्रमाणे आता दुभत्या जनावरांपर्यंतही ‘आधार’द्वारे पोहोचता येणार आहे. राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४२ हजार दुभत्या जनावरांचे आधार टॅग करण्यात आले असून, तब्बल दोन लाख जनवारांना टॅगींग केले जाणार आहे.
दुभत्या जनावरांच्या कानांना टॅगींग लावल्यानंतर या जनावरांचे वय, उंची, आहार याची माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअरमध्ये आॅनलाईन भरण्यात येणार आहे. तसेच जनावरांच्या मालकाचे नाव, गाव, जनावरांची जात, किती दूध देते, लसीकरण कधी झाले? याची माहिती असणार
आहे.
विशेषत: दुधाळ जनावरांना ‘फायबर’चा टॅग (बिल्ला) लावला जाणार आहे. यातून शासनाला जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जनावरांचे टॅगींग झाल्यानंतर संबंधित गावातील जनावरांच्या सर्व माहितीची मास्टर फाईल तयार करण्यास सोपे होणार आहे. तसेच आजारी-निरोगी जनावरांपासून तयार होणाऱ्या पशुजन्य पदार्थाचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही. नवीन प्रणालीनुसार या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात २०१२ च्या पशुगणेनुसार २ लाख ६३ हजार सहाशे चार दुभत्या जनावरांची संख्या आहे. राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यात ४२ हजार दुभत्या जनावरांना आधार टॅगींग करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांकडून नोंदणी केली जाणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून दुभत्या जनावरांना आधार टॅगींग करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त कºहाड तालुक्यामध्ये आधार टॅगींग करण्यात आले आहे. याठिकाणी ५३ हजार २१८ दुभत्या जनावरांची संख्या असून, यात ९ हजार २५४ जनावरांना टॅगींग करण्यात आले आहे. तसेच फलटण तालुक्यात ३४ हजार ५७५ दुभत्या जनावरांची संख्या असून, यामध्ये ८ हजार ४०१ जनावरांना टॅगींग केले आहे.
आधारचे फायदे
दुभत्या जनावरांच्या आधार नोंदणीमुळे ब्रिडिंग, न्यूट्रीशन, आरोग्याची सर्व माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर लसीकरण, जनावरांची विक्री व संख्या तसेच या विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची ओळख सहज पटणार आहे.
वर्षभर चालणार काम
राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यात आधार टॅगींगचे काम सुरू झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आतापर्यंत ४२ हजार जनावरांना टॅगींग करून झाले आहे. तसेच टॅगचे काम वर्षभर चालणार आहे.
तालुके दुभती जनावरं,
टॅग केलेली जनावरे
सातारा २४७९२ ५६८४
वाई १६२९८ ४३८३
कोरेगाव २५९६० २२६३
जावळी ९३४५ ११५२
फलटण ३४५७५ ८४०१
कºहाड ५३२१८ ९२४५
खंडाळा १२४१२ १२७५
खटाव २६७६२ ३४१९
माण २७६३८ १७०२
पाटण २८९८५ ४११०
महाबळेश्वर ३६१९ २९२०