अख्खं रुग्णालय धावलं वृद्धेच्या मदतीला-- लोकमतचा प्रभाव

By admin | Published: December 24, 2014 11:06 PM2014-12-24T23:06:02+5:302014-12-25T00:13:59+5:30

शल्यचिकित्सक संतप्त : पैसे मागणाऱ्या ‘त्या’ रुग्णवाहिका चालकाची चौकशी सुरू

Aakhh hospital is helping the elderly - the effect of Lokmat | अख्खं रुग्णालय धावलं वृद्धेच्या मदतीला-- लोकमतचा प्रभाव

अख्खं रुग्णालय धावलं वृद्धेच्या मदतीला-- लोकमतचा प्रभाव

Next

सातारा : रुग्णवाहिकेअभावी आपल्या आजारी आईला स्ट्रेचरवरून घेऊन जाताना एका हतबल गरीब मुलाला अर्धा किलोमीटर रस्त्यावर प्रचंड कसरत करावी लागली, याचा वृत्तांत ‘लोकमत’मध्ये आज, बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खं जिल्हा रुग्णालय त्या वृद्धेच्या मदतीसाठी धावलं. आजारी वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार देणाऱ्या चालकाच्या चौकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिले आहेत.
शांता बापूराव घाडगे (वय ७०, रा. फत्त्यापूर, ता. सातारा) या पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, पायाचा एक्स-रे काढण्याचा सल्ला रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या मुलाला दिला.
एक्स-रे काढण्यासाठी रुग्णालयात कोणतीही सोय नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. रुग्णवाहिका चालकाने पैसे मागितल्याने मुलाने आईला स्ट्रेचरवर घेऊन खासगी रुग्णालय गाठले होते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. काल, मंगळवारी सकाळपासून शांता घाडगेंवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची रीघ लागली. वॉर्डमधील परिचारिकाही त्यांच्याशी चांगल्या बोलू लागल्या. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे. घाडगे यांच्या नातेवाइकांनीही त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या आईची प्रकृती आता चांगली असल्याचेही घाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

‘रुग्णांना तातडीने योग्य सुविधा द्या. कोणाचीही तक्रार येता कामा नये,’ अशा शब्दांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली. तसेच संबंधित रुग्णवाहिका चालकाची खातेअंतर्गत चौकशीही सुरू केली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.


माझ्या आईच्या बाबतीत जसा प्रसंग ओढावला, तसे कोणाच्याही बाबतीत होऊ नये.
- रवींद्र घाडगे

 

Web Title: Aakhh hospital is helping the elderly - the effect of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.