दुष्काळी माणमध्ये श्रमदानासाठी येणार आमिरखान
By admin | Published: March 21, 2017 12:56 PM2017-03-21T12:56:14+5:302017-03-21T13:00:03+5:30
वॉटर कप स्पर्धा : बिदालमध्ये ९ एप्रिलला उपस्थिती; तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग राहणार
आॅनलाईन लोकमत
दहिवडी : वॉटर कप स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांतील २०६७ गावे उतरली आहेत. यामध्ये माण तालुक्यातील ३२ गावांनीही सहभाग घेतला आहे. तालुक्यातील बिदाल गावातील श्रमदानासाठी दि. ९ एप्रिल रोजी अभिनेता अमिर खान येणार आहे. त्यामुळे या स्पधेर्ला आणखी बळ मिळणार आहे.
वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या माणमधील गावांनी वॉटर कप जिंकायचाच या हेतूने कामाला गती दिली आहे. ही स्पर्धा दि. ८ एप्रिल ते २२ मे अशी होणार असली तरी प्रत्येक गावाने कामाचा आराखडा तयार केला आहे. ठिकठिकाणी ग्रामसभेचे आयोजन सुरु आहे. सर्व राजकीय वैर विसरुन गावची गावं पाण्यासाठी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहेत. प्रशासकीय अधिकारीही दिवसरात्र झटत आहेत. माण तालुक्यातील ३२ गावे ही प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास आधिकारी सांगवे, कृषीअधिकारी राजेश जानकर यांनी प्रत्येकी ८ प्रमाणे दत्तक घेतली आहेत. सगळीच गावे पाणी समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ यांनी पिंजून काढली असून गावामध्ये माती परीक्षण, शोषखड्डे, आगकाडी मुक्त शिवार याची कामे सुरु आहेत.
माण तालुक्यातील सहभागी गावात सर्वात मोठे गाव बिदाल आहे. गावातील ग्रमसभेची सिने अभिनेता, वॉटर कपचा ब्रँडअ?ॅम्बिसेडर अमिर खान लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी दि. ९ एप्रील रोजी बिदाल गावात येत आहे. अशी माहिती समन्वय समितीने दिली आहे. राज्यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बिदाल गावाची ख्याती असल्याने अमिर खान याच्या उपस्थितीने बिदाल पून्हा चर्चेत येणार आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी ३० हजार जण श्रमदानासाठी उतरणार...
माण तालुक्यातील श्रमदानासाठी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी किमान २५ ते ३० हजार लोक एकावेळी उतरतील असा अंदाज आहे. सेलीब्रेटी, डॉक्टर, वकील शिक्षक, ग्रामसेवक, स्वातंत्र्य सैनिक, महिला बचत गट, इंजिनिअर, युवक मंडळे यांच्यासह मुंबई-पुणेकर मंडळी, नोकरदार वर्ग या दिवशी उपस्थित रहाणार आहे. या लोकांची व्यवस्था, त्यांना लागणारी यंत्रसामर्गी, कामाचे वर्गीकरण याचे नियोजन सुरु आहे. प्रत्येक गावाने दुष्काळमुक्त व्हायचंच यासाठी चंग बांधला आहे. शिवारफेरीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे. कामाची रोजची माहिती मिळावी, सहभाग वाढावा यासाठी वाड्यावस्त्यावर जाऊन माहिती दिली जात आहे. गावामध्ये संपर्क कार्यालय सुरु केले आहे.