अंगणवाडी सेविकांचे ‘जेल भरो’

By Admin | Published: February 26, 2015 10:30 PM2015-02-26T22:30:42+5:302015-02-27T00:16:27+5:30

किमान वेतन : सेवानिवृत्ती वेतनही देण्याची मागणी

Aanganwadi seviks 'jail bharo' | अंगणवाडी सेविकांचे ‘जेल भरो’

अंगणवाडी सेविकांचे ‘जेल भरो’

googlenewsNext

सातारा : कॉम्रेड चंद्रेश्वरी आयोगाच्या शिफारशी लागू करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या आणि इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी सातारा शहरात ‘जेल भरो’ आंदोलन केले. महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू व्हावे, साठ वर्षांवरील सेविकांना पेन्शन मिळावी, आंदोलनकाळातील पगार मिळावा, प्राथमिक शाळांप्रमाणे सेविका आणि मदतनीसांना एक महिन्याची उन्हाळी सुटी एकाच वेळी मिळावी, दिवाळीसाठी मानधनाएवढी भाऊबीज भेट मिळण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, मानधनाऐवजी पगाराची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, २००८ पासून सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना एकरकमी पेन्शन मंजूर व्हावी, थकित रकमा त्वरित मिळाव्यात आणि मानधन वेळेत मिळावे, या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.
राज्य सरकारने रिक्त जागी काम केलेल्याचा मोबदला मासिक २००० रुपये प्रमाणे मिळावा, ग्रामीण प्रकल्पाच्या शहरी विभागातील अंगणवाडी केंद्रास किमान १००० रुपये भाडे मिळावे, सेविकांनी मानधनातून दिलेले भाडे परत करावे, अंगणवाडी तालुका प्रकल्प कार्यालयास जादा लिपिकवर्ग मंजूर व्हावा, सेविका-मदतनीसांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, चार तासांपेक्षा अधिक काम करून घेतल्यास ताशी २५ रुपयेप्रमाणे मोबदला मिळावा, टी. एच. आर. आहार बंद करावा, आहार शिजविण्याचे काम सेविका-मदतनीसांकडेच द्यावे, प्रतिलाभार्थी १० रुपये दर मिळावा, सेविका वैद्यकीय अधिकारी नसल्याने जंतनाशक गोळ््यांच्या वाटपाचे काम त्यांना देऊ नये, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.
केंद्र शासनाने कामगारांच्या हिताविरोधी केलेले कायदे रद्द व्हावेत, खासगीकरण, कंत्राटीकरणास चालना मिळेल अशी कृती होऊ नये, तरुणांना स्थिर जीवन जगण्याची संधी मिळावी, दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील असा फरक रेशन कार्डात न करता ३५ किलो धान्य व १४ जीवनावश्यक वस्तू नियंत्रित दराने उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणीही सेविका-मदतनीसांनी केली. (प्रतिनिधी)


अपुरे मानधन; बिलेही नाहीत
गेले वर्षभर अंगणवाडी सेविकांना अपुरे मानधन मिळाले असून, पाच ते सहा महिन्यांची आहार बिलेही मिळाली नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. एक ते दीड वर्षांचा प्रवास भत्ता न मिळाल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. या रकमा तातडीने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही अंगणवाड्यांना रेशनिंग मिळत नाही. गरजेइतके धान्य अंगणवाडी केंद्रांना दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. योग्य कृती न झाल्यास दीर्घ आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

Web Title: Aanganwadi seviks 'jail bharo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.