माढ्यात अभयसिंह जगतापांमुळे राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच, शरद पवारांची घेतली भेट
By नितीन काळेल | Published: April 15, 2024 07:08 PM2024-04-15T19:08:32+5:302024-04-15T19:12:13+5:30
सकारात्मक चर्चेनंतरही दोन दिवसांत निर्णय घेणार
सातारा : माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तुतारी वाजविण्याच्या तयारीतील अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असलीतरी दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. पण, सध्या ते प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची भेट घेऊन चाचपणी करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे माढ्यात राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातही दोन गट पडले. पक्षाचे तीन आमदार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. तसेच बहुतांशी नेतेमंडळीही अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे माढ्यात मोजक्याच शिलेदारांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भिस्त आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांचा समावेश आहे. माढा लोकसभेसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून ते सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरत होते. तसेच संपर्क वाढवत पक्षाला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला.
पण, शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे अभयसिंह जगताप नाराज झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा इशाराही दिला. जगताप यांनी बंडखोरी केल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच फटका बसणार होता. हे ओळखून वरिष्ठांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी सकाळी पुण्यात शरद पवार यांची अभयसिंह जगताप यांनी भेट घेतली. यावेळी माढा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा झाली. तसेच मतदारसंघातील प्रश्न, ते सोडविण्यासाठी मला उमेदवारी मिळायला हवी, असे जगताप यांनी सांगितले. यावर पवार यांनी मी तुमच्याबरोबर आहे. कल्पना मांडा. लोकसभा निवडणुकीनंतर आपण भेटू, असे पवार यांनी जगताप यांना आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. तरीही जगताप हे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचीही भेट घेणार असल्याची नवीन माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे जगताप हे काय निर्णय घेणार यावरच माढ्यातील राष्ट्रवादीचा तिढा सुटणार की वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली आहे. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. सर्व बाबतीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तरीही माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार आहे. यासाठी दोन दिवसांचा तरी वेळ लागणार आहे. - अभयसिंह जगताप, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस