अभिजित बिचुकलेला ‘धनादेश’प्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:42 PM2019-06-21T23:42:49+5:302019-06-21T23:42:54+5:30

मुंबई/सातारा : मराठी लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले साताऱ्यातील स्पर्धक अभिजित बिचुकले बिग ...

 Abhijit bitcoin arrested for 'check' | अभिजित बिचुकलेला ‘धनादेश’प्रकरणी अटक

अभिजित बिचुकलेला ‘धनादेश’प्रकरणी अटक

Next

मुंबई/सातारा : मराठी लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले साताऱ्यातील स्पर्धक अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. धनादेश न वटल्याने सातारा पोलिसांनी शुक्रवारी त्याला आरे पोलिसांच्या मदतीने अटक केली. बिचुकले याला आज, शनिवारी सातारा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अभिजित बिचुकलेवर न्यायालयात भा दं वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल असून, २८ हजारांचा धनादेश वटला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे पत्र आणि न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी सकाळी मुंबईला रवाना झाले. ही टीम बिग बॉस मराठी सिझन २ च्या सेटवर थेट दाखल झाले. मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसर आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने सातारा पोलिसांना आरे पोलिसांनी मदत केली. त्यानंतर बिचुकलेला अटक करण्यात आली.
बिचुकले याला शनिवार, दि. २२ रोजी सातारा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे बिचुकले याचा बिग बॉसमधील प्रवास येथेच थांबणार का, याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.
बिग बॉसच्या घरातील एक टास्क या आठवड्यात खूपच वादग्रस्त ठरला होता. बिचुकले आणि सहस्पर्धक रूपाली भोसले यांच्यात प्रचंड वादावादी झाली. बिचुकले खोटे बोलतात, इतरांना फसवतात, असा आरोप रूपालीने केला होता. बिचुकलेंनी हे आरोप फेटाळताच, मुलीची शपथ घ्या, असे रूपाली म्हणाली. ते ऐकल्यानंतर बिचुकलेंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रूपालीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

कोण आहे बिचुकले...
अभिजित बिचुकले (वय ४२) याने सातारा येथील लालबहादूर शास्त्री कॉलेजमधून बीए (इंग्रजी) पूर्ण केले. साताºयामधील केसरकर पेठ येथे त्याचे घर आहे. त्याच्या कविता करण्याच्या छंदामुळे लोक त्याला ‘कवी मनाचे नेते’ या टोपण नावाने ओळखतात. क्षितीज हा त्याचा बाल कविता संग्रह १९९६ मध्ये प्रकाशित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्याला राष्ट्रपती करावे, अशी विनंतीही त्याने केली होती. खासदार उदयनराजे देखील मिश्कीलपणे ‘मी कोणाला भीत नाही. फक्त अभिजित बिचुकलेंना घाबरतो,’ असे म्हणतात. अभिजित बिचुकले हा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सातारा पालिकेचा कर्मचारी होता. जेमतेम दहा वर्षे त्याने पालिकेत काम केले. कामात कुचराई, कामावर हजर न राहणे यासह त्याच्याकडून तक्रारीच जास्त होत होत्या. त्यामुळे त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत तो दोषी आढळल्याने त्याला पालिकेने सेवेतून बडतर्फ केले. त्यानंतर तो राजकीय क्षेत्रात सक्रिय झाला. यापूर्वी त्याने दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. सांगली जिल्'ातील कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघातूनही त्याने पोट निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी त्याने अर्ज काढून घेतला होता. लोकसभा निवडणुकीत त्याला मते किती पडली, हा विषय गौण असला तरी सध्या तो एक दिवस मी पंतप्रधान होणार, अशी वग्लनाही करत आहे. त्याने स्वत:वर चित्रित केलेल्या दोन गाण्यांचे अल्बमही प्रसारित झाले आहेत.

काय आहे प्रकरण..
अ‍ॅड. संदीप सपकाळ यांनी २०१५ मध्ये अभिजित बिचुकले याला साताºयातील केसरकर पेठेतील फ्लॅट भाड्याने दिला होता. त्यावेळी बिचुकले याने अ‍ॅड. सपकाळ यांच्याकडून २८ हजार रुपये उसने घेतले होते. याबदल्यात बिचुकले याने त्यांना धनादेशदिला होता. काही दिवसांनंतर अ‍ॅड. सपकाळ यांनी धनादेश बँकेत जमा केला असता तो वटला नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टात खटला दाखल केला. या खटल्यासाठी कोर्टात हजर राहण्यासाठी न्यायालयाने अनेकदा बिचुकलेला समन्स बजावले होते. मात्र, बिचुकले कोर्टात हजर राहिला नाही. परिणामी न्यायालयाने गुरुवारी बिचुकले विरोधात अटक वॉरंट काढले. त्याचे पत्र पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना देण्यात आले. त्यानंतर अधीक्षक सातपुते यांनी बिचुकलेला पकडण्यासाठी एलसीबीची टीम मुंबईला रवाना केली.

Web Title:  Abhijit bitcoin arrested for 'check'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.