लाकडाच्या अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:02+5:302021-05-24T04:38:02+5:30
सातारा : शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडाच्या विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख ...
सातारा : शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडाच्या विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांना बेकायदा लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आंबेदरे (ता. जि. सातारा) येथे सापळा लावण्यात आला. लाकूड मालाची विनापरवाना अवैध वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर (क्र. एम. एच. - ११, जी ४५४३, ट्रॉली क्र. एम. एच. - ११, आर ६७०) व पिक अप (क्र. एम. एच. - ११, टी २५६४) अशी दोन वाहने वन विभाग भरारी पथकाने ताब्यात घेतली आहेत.
चौकट :
हे आहेत शिलेदार
याप्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश विरकर, सुहास पवार, वनरक्षक विजय भोसले यांनी केली. मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ड्रोंगो संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे व ओंकार ढाले यांनी त्यांना सहकार्य केले.
सजग नागरिकांना आवाहन
अशाप्रकारे अवैध लाकूड वाहतूक किंवा वन्यजीवाची शिकार होत असल्यास त्याची माहिती जागरुक नागरिकांनी १९२६ या टोलफ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाराचे नाव गुप्त राखण्यात येईल, असे आवाहनही सचिन डोंबाळे यांनी केले आहे.
______________________