संक्रांतीसाठी कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:03 AM2021-01-08T06:03:12+5:302021-01-08T06:03:12+5:30
कुडाळ : भारतीय प्राचीन परंपरेनुसार जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगडे ...
कुडाळ : भारतीय प्राचीन परंपरेनुसार जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगडे बनविण्याची सध्या लगबग सुरू असून, कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याच्या कामांनी वेग धरला आहे.
दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभारांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे कुंभार व्यवयाय अडचणीत आले असले तरी सुगडी बनविण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कामात मदत करतो, असे महेश कुंभार सांगितले.
संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण. ‘तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला..’ असा संदेश देत एकमेकांच्या प्रति प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी यातून मिळते. महिलांसाठी हा विशेष सण मानला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधले जाते. त्यामुळे वाण घेण्यासाठी छोटे खण (सुगडी) यांना महत्त्व आहे. आजही खेडोपाडी पारंपरिक वस्तूविनिमय पद्धतीचा उपयोग होत आहे. गावकी करीत कुंभार आपल्या वस्तूंच्या मोबदल्यात धान्य स्वीकारत लोकांना मातीच्या वस्तू पुरविण्याचे काम करीत आहेत.
कोट:
कोरोनाचा मोठा फटका आम्हाला बसला असून, कुंभारकाम या पारंपरिक व्यवसायातूनच उदरनिर्वाह होत आहे. आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने थोडाफार आर्थिक हातभार लागण्यास मदत होईल. प्रचंड मेहनत करूनही आजही कुंभार समाज गरिबीच्या परिस्थितीच आपला व्यवसाय करीत आहे आणि कारागिरीचा योग्य मोबदलाही मिळत नाही.
- ऋषिकेश कुंभार, कारागीर
फोटो: ०७कुडाळ
संक्रांत जवळ आल्याने आंबेघर-कुडाळ (ता. जावळी) येेथे रात्री उशिरापर्यंत सुगड्या भाजण्याचे काम सुरू आहे. (छाया : विशाल जमदाडे)