एसटीत जागा न मिळाल्याने बिचाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी
By admin | Published: July 21, 2016 10:57 PM2016-07-21T22:57:13+5:302016-07-22T00:20:30+5:30
हरळीतील प्रकार : गाडीत जागा न मिळाल्याने बसावे लागले घरी
खंडाळा : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय गुरुवारी खंडाळा तालुक्यातील हरळी येथे अनुभवास मिळाला. एसटीत जागाच न मिळाल्याने तेथील बारा विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागले. यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.हरळी हे गाव खंडाळा तालुक्याच्या ठिकाणापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी चौथीपर्यंतच शिक्षणाची सुविधा आहे. पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी हरळीतील मुला-मुलींना खंडाळ्याला जावे लागते. त्यासाठी लोणंदवरुन पाडळी-धावडवाडी मार्गे खंडाळ्याला जाणाऱ्या एसटीवर तेथील मुलं अवलंबून आहेत. गावातील मुलं शाळेला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी बसस्थानकावर उभी होती. ठरल्याप्रमाणे एसटीही आली. परंतु, एसटीत जागाच नसल्याने केवळ मुलींनाच जागा मिळाली.
एसटी अगोदरच प्रवाशांनी खचाखच भरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागा मिळालीच नाही. साहजिकच एक दिवस घरी बसून काढावा लागला. मात्र, शाळा बुडल्यामुळे शिक्षक काय म्हणतील?, गृहपाठ दिला असेल का?, पालकांना काय सांगायचे या दडपणाखाली ते दिवसभर वावरत होते. वास्तविक पाहता या गावात पुन्हा दुपारपर्यंत दुसरी गाडी नसल्याने इतर प्रवाशांनीच किंवा वाहकांनी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते; पण तसे काहीच न झाल्याने शैक्षणिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना प्राधान्य
यासंदर्भात पारगाव-खंडाळा आगार व्यवस्थापक मिलिंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मुलांना बसमध्ये घेतले गेले नाही, असे होणार नाही. काही वेळा प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे जागाच उपलब्ध होत नाही, तेव्हा वाहकांचाही नाईलाज होतो. विद्यार्थ्यांना प्राधान्याने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसे फलकही लावले आहेत. तरीही यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.’