निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:45 AM2019-03-08T05:45:50+5:302019-03-08T05:46:07+5:30
आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे.
- नितीन काळेल
सातारा : आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे. सकाळच्या स्वयंपाकासह दिवसभर घरातील कामे पुरुषांनी करावयाची तसेच रात्री सामूहिक गावजेवण करायचे असा निर्णय त्यांनी घेतलाय. विशेष म्हणजे, यासाठी ग्रामसभेत तसा ठरावही संमत झाला आहे.
साताºयाजवळील निसराळे येथे महिला दिन अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क या महाविद्यालयाने निसराळे हे गाव दत्तक घेतले आहे. याच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना मांडली. सर्व गावकऱ्यांनी त्याला आनंदाने संमती दर्शवली.
निसराळे गावात महिलांसाठी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे दिवसभर घरचे कोणतेच काम करावे लागणार नसल्याने महिला अगदी निवांतपणे त्यात सहभागी होतील. निसराळेच्या सरपंच रूपाली कांबळे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५
सदस्या महिला आहेत. गावातील विकासकामांमध्ये त्या सहभागी होतात. आमच्या गावात समाजकार्य महाविद्यालयातर्फे वेळोवेळी अनेक उपक्रम राबविले जातात आणि त्यात महिलांचा सहभाग मोठा असतो.
उपसरपंच अंकुश घोरपडे यांनी सांगितले की, रोजच्या घरकामाच्या ओढाताणीतून महिलांना थोडीशी उसंत मिळावी, याकरिता ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनी सर्व गावातील सर्व महिला त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थात संध्याकाळच्या सामूहिक भोजनातील स्वयंपाकाला मेनू काय असणार, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच दिवसभर स्वयंपाकघर सांभाळण्याचा शब्द कारभारी किती खरा करणार, याची उत्सुकता आहे. त्यामुळे एका लहान गावात होणाºया महिला दिनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
>गावात ३२६ कुटुंबे
निसराळे गावात ३२६ कुटुंबे राहत आहेत. तर गावाची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे.
निसराळे ग्रामपंचायतीची आणि सोसायटीची निवडणूकही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे गावात एकीचे वातावरण असते.
>ध्वनिक्षेपकावरून गावात जागृती
महिला दिनी होणाºया या कार्यक्रमाची दवंडीदेखील देण्यात आली आहे. त्यामध्येही दिवसभर पुरुषांनाच घर सांभाळायचे आहे, असे सर्वांना ठणकावण्यात आले आहे.