बामणोलीच्या डोंगरात मिळतोय मुबलक रानमेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:27+5:302021-07-23T04:23:27+5:30
बामणोली : पावसाळा सुरू होताच बामणोलीच्या डोंगररांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अनेक स्थानिक वयोवृद्ध या रानभाज्या शोधून आणून घरी ...
बामणोली : पावसाळा सुरू होताच बामणोलीच्या डोंगररांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अनेक स्थानिक वयोवृद्ध या रानभाज्या शोधून आणून घरी बनवून खातात. या भाज्या आयुर्वेदिक व पूर्णपणे नैसर्गिक असतात. या भाज्यांबरोबरच इतर रानमेवाही रानातून मिळतो. यामध्ये मध, खेकडे, फळे, फुले असे अनेक उपयोगी घटक डोंगरातून मिळतात; परंतु सध्या रानअळंबीची रोहने डोंगरात अनेक ठिकाणी निघत आहेत.
जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत अळंबी मोठ्या प्रमाणात निघतात. ही पूर्णपणे दुर्मीळ, नैसर्गिक व पौष्टिक असतात. मान्सूनचा पाऊस सुरू होऊन जमिनीत पुरेसे ओल झाल्यावर डोंगर उतारावर, गवताच्या कुरणात, करंवंदीच्या जाळीत तसेच वारुळाच्या ठिकाणी अळंबीची मोठमोठी रोहने निघतात. अशा ठराविक जागा डोंगरात असतात तेथे दरवर्षी भरपूर प्रमाणात अळंबी निघतात. स्थानिकांना या जागा माहीत असतात. तेथे अधूनमधून प्रत्यक्ष जाऊन ते पाहत असतात. सकाळी लवकर जाऊन ती काढावी लागतात. चार तासांपेक्षा जास्त वेळ झाला तर अळंबी खराब होऊन जातात. अळंबी निघण्याची जागा भुसभुशीत झालेली असते, त्याठिकाणी अनेकजण गेले तर पायाने ती जमीन टणक होऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी अळंबी निघत नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर जाऊन एकट्याने काहीही न बोलता ही अळंबी गुपचूप काढायची, असा संकेत ठरलेला असतो. अळंबीचे छोटे व मोठे असे प्रकार असतात. मोठ्या प्रकाराला कुरटे अळंबी म्हणतात व छोट्या अळंबींना बैले व चितळे अळंबी अशी नावे स्थानिकांनी ठेवलेली आहेत. खाण्यायोग्य अळंबी कोणती, हे स्थानिक जाणकार लगेचच ओळखून सांगतात.
चौकट
अनेक आजारांपासून बचाव!
अळंबी खाण्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरुम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज् तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिज पदार्थ, जीवनसत्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर आहारात मशरुमचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
कोट..
मला रान अळंबी खायला खूप आवडतात. मी पावसाळा सुरू झाल्यावर अळंबी निघायच्या जागेवर जाऊन अधूनमधून पाहत असतो. यावर्षी मला दोनवेळा रोहने मिळाली. त्यामध्ये सुमारे चारशे-पाचशे अशी टपभर अळंबी होती. ती मी माझ्या शेजारी, गावच्या लोकांना आणून दिली. एक रोहन मात्र जास्त पावसाने खराब होऊन गेले.
- भगवान शिंदे, ग्रामस्थ, सावरी, ता. जावळी