शेतकऱ्यांनो खरिपाची तयारी करा; खत, बियाणे साठा मुबलक उपलब्ध

By नितीन काळेल | Published: April 18, 2023 04:45 PM2023-04-18T16:45:29+5:302023-04-18T16:45:48+5:30

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९७ हजार ३४८ हेक्टर आहे

Abundant stock of chemical fertilizers and seeds required for Kharif season is available in Satara district | शेतकऱ्यांनो खरिपाची तयारी करा; खत, बियाणे साठा मुबलक उपलब्ध

शेतकऱ्यांनो खरिपाची तयारी करा; खत, बियाणे साठा मुबलक उपलब्ध

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यातील आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी विविध पीकपद्धती पाहता आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच खतांच्या काळाबाजार रोखण्यासाठीही १२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे,' असा विश्वास कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन एक हंगाम घेण्यात येतात. यामध्ये खरीप हंगाम हा सर्वात मोठा असतो. या पिक हंगामासाठी खते आणि बियाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कृषी विभागाचे नियोजन हंगामापूर्वी दोन-तीन महिने झालेले असते. त्यामुळे पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांना फारशी अडचण येत नाही. आताही कृषी विभागाने जिल्ह्यातील  खरीप हंगामाचे नियोजन केलेले आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९७ हजार ३४८ हेक्टर आहे. त्यासाठी ४७ हजार ३३९ क्विंटल बियाणे मागणी नोंदविण्यात आलेली आहे.  तर १ लाख ३६ हजार ५०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालय यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर कृषी आयुक्तालयकडून जिल्ह्यासाठी १ लाख १५ हजार १०१ मेट्रिक टन रासायनिक खत आणि ५४ हजार ७७० नॅनो युरिया बॉटलचे आवंटन खरीप हंगामासाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ४२ हजार ५२१ मेट्रिक टन, डीएपी १२ हजार १३१ मेट्रिक टन, एमओपी ६ हजार ७६१ मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट ११ हजार ९३९ मेट्रिक टन तर इतर संयुक्त खते ३९ हजार १९  मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३ हजार ५६१ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील ५५ हजार ८६२ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. तर आता एक एप्रिलपासून ७ हजार ६९९ मेट्रिक टन खत पुरवठा करण्यात आलेला आहे. उपलब्ध खतामध्ये युरिया १८ हजार ९४३ मेट्रिक टन, डीएपी ९ हजार ११९ मेट्रिक  टन, एमओपी ८३४ मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ७९८ मेट्रिक टन, इतर संयुक्त खते २४ हजार ८६७ मेट्रिक टनचा समावेश आहे.  

तालुकास्तरावर सर नियंत्रण कक्ष स्थापन... 

 रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच खतांच्या सुयोग्य समतोल वितरणासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.   

कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले द्यावीत. तसेच शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठाविषयी शंका असल्यास संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.  - भाग्यश्री पवार-फरांदे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
 

कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खतांची माहिती पाहण्यासाठी कृषी विभागाने कृषिक ॲपच्या माध्यमातून सेवा उपलब्ध केलेली आहे. हे कृषिक ॲप शेतकरी बांधवांनी डाऊनलोड करून खत उपलब्धतेच्या सेवेचा लाभ घ्यावा. -  विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

Web Title: Abundant stock of chemical fertilizers and seeds required for Kharif season is available in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.