गाडी जाळतो म्हणत पोलिसाला शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा : शहर ठाण्यात गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Updated: May 19, 2023 18:53 IST2023-05-19T18:53:44+5:302023-05-19T18:53:57+5:30
सातारा : शहरातील पोवई नाक्यावर दुचाकी थांबवून कागदपत्रे मागितल्याप्रकरणी एकाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच गाडी ...

गाडी जाळतो म्हणत पोलिसाला शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा : शहर ठाण्यात गुन्हा नोंद
सातारा : शहरातील पोवई नाक्यावर दुचाकी थांबवून कागदपत्रे मागितल्याप्रकरणी एकाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच गाडी जाळून टाकतो, असे धमकावले. त्यामुळे याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार लक्ष्मण साठे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार १७ मे रोजी दुपारच्या सुमारास पोवई नाका परिसरात हा प्रकार घडला आहे. दुचाकी (एमएच,११. डीके, ३३००) वरून एक जण आला होता. या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे त्याला कागदपत्रे मागविण्यात आली. यावरून संबंधिताने मी कागदपत्रे दाखविणार नाही, तुला काय करायचे ते कर. नंबरप्लेटही लावणार नाही, असे वर्तन केले.
तसेच दंडात्मक कारवाईसाठी दुचाकीचा फोटो काढताना संबंधिताने पोलिसाच्या अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा आणला. ऑनलाइन दंड भरायचा नाही. तू बाहेर भेट तुला दाखवतो, अशी दमदाटीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी क्रेनच्या सहाय्याने ट्रॅफिक ऑफिसमध्ये आणली. तेथेही मी गाडी जाळतो, असे बाेलून शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे संबंधिताच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.