ऊस तोडणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:30+5:302021-02-23T04:58:30+5:30
व्हीआयपीचे निदर्शने आंदोलन सातारा : कोरोना काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुद्रा योजनेतील कर्जधारकांचे सर्व कर्ज माफ करण्यात ...
व्हीआयपीचे निदर्शने आंदोलन
सातारा : कोरोना काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुद्रा योजनेतील कर्जधारकांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी विश्व इंडियन पार्टी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नदीपात्रात घाण पाणी
सातारा : लोंब गोवे परिसरात कृष्णा नदीच्या पाण्यात मळीसदृश रसायन मिसळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. तेथे मासे पकडण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गुरुवारी सकाळच्या सुमारास कृष्णा नदीच्या पाण्यात मळीसदृश रसायन मिसळल्याने नदीच्या पाण्याला तवंग आला होता.
कारवाईची मागणी
सातारा : एसटीमध्ये डिझेल भरलेले असल्याने सिगारेट, बिडीच्या थोटकांमुळे आग लागून अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या परिसरामध्ये धूम्रपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी बसेसना आग लागल्याची घटना घडली होती.
प्रवाशांमध्ये समाधान
मायणी : मायणी बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून बसस्थानकात एसटी जात नव्हत्या. रस्त्याचे काम पूर्ण होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ होती. तसेच कोरोनामुळे काही गावांमध्ये एसटी पोहोचत नव्हत्या. मात्र, आता एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.
एसटी फेऱ्या वाढवा
फलटण : शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने फलटण तालुक्यात एसटीला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे काही विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, ही गैरसोय थांबविण्यासाठी फलटण आगाराने एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
वीज चोरीत वाढ
सातारा : खटाव तालुक्यातील लाडेगाव येथे वीजवितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वीज चोरी सुरू आहे. या वीज चोरीला कारणीभूत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य ग्राहकांतून होत आहे.
रस्त्याची चाळण
सातारा : सातारा नगरपालिकेच्या हद्दीवाढीत समावेश होऊनही शाहूपुरीकर अद्यापही विकासकामांपासून वंचित आहेत. गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावर रस्ता शोधताना वाहनचालकांची परवड होत
आहे.
अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी..
सातारा : सातारा शहरातील राजवाडा परिसरातील चौकांमध्ये अवजड वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते अरुंद असून, वाहनांची संख्या मात्र भरमसाठ वाढत आहे. राजवाडा परिसरात ग्रामीण भागातील दळणवळण जास्त असून, दुकानांची संख्या जास्त आहे. तसेच जुन्या इमारती असल्याने रस्ता रुंदीकरणाला वाव नाही. त्यातच या परिसातील दुकांनामध्ये माल घेऊन येणारी वाहने रस्त्यावर उभी करून माल उतरविला जातो.