माण बाजार समितीसाठी मोर्चेबांधणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:19+5:302021-05-29T04:28:19+5:30
दहिवडी : माण बाजार समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिठ्ठीवर नशीब आजमावून सभापती, उपसभापतींची निवड करावी लागल्याने तालुक्यातील अनेकांच्या काळजाचा ...
दहिवडी : माण बाजार समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिठ्ठीवर नशीब आजमावून सभापती, उपसभापतींची निवड करावी लागल्याने तालुक्यातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सहकारावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे ठरविणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. मतदार यादीतील हरकती, अंतिम यादी हा कार्यक्रमही लागला असल्याने या निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. पण कोरोनामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
माण तालुक्यात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेखर गोरे हे राष्ट्रवादीमध्ये होते. त्यावेळी माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ व शेखर गोरे यांचे राष्ट्रवादीचे पॅनल उभे होते. त्यांच्याविरोधात आमदार जयकुमार गोरे व अनिल देसाई यांनी एकत्रित पॅनल उभे केले होते. बाजार समितीमध्ये विकास सेवा सोसायटीमधून अकरा, ग्रामपंचायतींमधून चार, व्यापारी मतदार संघातून दोन, हमाल मापाडीमधून एक असे अठरा संचालक होते. त्यावेळी दोन्हीही पॅनलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये जयकुमार गोरे यांच्या ६ तर अनिल देसाई यांच्या ३ अशा ९ जागा होत्या. त्यामुळे सभापती निवडी चिठ्ठीवर झाल्या. यामध्ये आमदार गोरे समर्थक अरुण गोरे यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीचे दादासाहेब जाधव यांची उपसभापतीपदी चिठ्ठीने निवड झाली होती.
बलाबल समान असल्याने पाच वर्षे दोघांनीही कार्यकाल पूर्ण केला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीचे नेतृत्व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याकडे आले. आमदार गोरे व अनिल देसाई यांचेही राजकीय संबंध बिघडत गेले. बाजार समितीची मुदत संपल्यास एक वर्ष उलटून गेले आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजार समितीवर प्रशासक नेमला होता. त्यावेळी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करुन नव्याने संचालक मंडळ अस्तित्वात आले होते. त्यावेळी प्रभाकर देशमुख यांनी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तिघांनाही संधी दिली होती. मात्र, या निवडीला सभापती अरुण गोरे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर पुन्हा जुन्या संचालकांना मुदतवाढ मिळाली होती. गेल्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघावर राष्ट्रवादीचे तर ग्रामपंचायतीवर आमदार गोरेंचे वर्चस्व असतानाही मतदारांनी समसमान संधी दिली होती. त्यामुळे बाजार समितीवर कोणीही हक्क सांगू नये, असा इशाराच मतदारांनी दिला होता. यावेळीही निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांचे पॅनल असणार आहे.
चौकट
शेखर गोरे, अनिल देसाईंची भूमिका महत्त्वाची
दुसरीकडे विरोधकांना एकत्र करण्यात देशमुख यांना भूमिका बजवावी लागणार आहे. शेखर गोरे, अनिल देसाई यांनाही मानणारे मतदार असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्यातरी आमदार गोरे व देशमुख यांना समसमान संधी असून, अनिल देसाई, शेखर गोरे यांचा ज्या पॅनलला पाठिंबा राहील, तिकडेच गुलाल असेल, असे चित्र सध्यातरी आहे. दुसरीकडे कोरोना काळात निवडणूक घेण्यापेक्षा ती बिनविरोध व्हावी, असाही प्रयत्न ऐनवेळी होऊ शकतो. पंचायत समितीमध्ये झालेल्या निवडणुकीतही शेखर गोरे वगळता सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली होती. त्यामुळे एकत्र येऊनही बिनविरोधचा फॉर्म्युला समोर येऊ शकतो, पण त्याला कितपत यश येईल ते येणारा काळच ठरवेल.
फोटो
जयकुमार गोरे
प्रभाकर देशमुख
शेखर गोरे
अनिल देसाई
डॉ. संदीप पोळ