दाभोलकरांच्या खुनाचा तपास गतीने करा
By admin | Published: November 20, 2014 09:38 PM2014-11-20T21:38:34+5:302014-11-21T00:27:44+5:30
अंनिसची मागणी : मुख्यमंत्र्यांना भेटणार
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला १५ महिने पूर्ण होत आले. या खुनाचा तपास लावण्यात शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास गतीने व्हावा, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. तसेच डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आला.
येथील परिवर्तन संस्थेमध्ये ‘अंनिस’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, कुमार मंडपे, युवराज झळके, भगवान रणदिवे, श्रीनिवास जांभळे उपस्थित होते.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला १५ महिने झाले तरीही मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने या नाकर्तेपणाचा यापूर्वी निषेधही केलेला आहे. या खुनाचा तपास यशस्वी न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तपास ‘सीबीआय’कडे दिला आहे. आता राज्याप्रमाणेच केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. त्यातच दि. १८ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात स्वत: लक्ष घालणार आहे, असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. दाभोलकरांचे खुनी व सूत्रधार पकडले जावेत, यासाठी योग्य कार्यवाची आमची मागणी आहे.’
डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत. तरी त्यांच्या बलिदानाचे कृतिशील स्मरण म्हणून ‘अंनिस’तर्फे राज्यात ठिकठिकाणी सभासद नोंदणी व जादूटोणाविरोधी कायदा प्रचार, शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे असे उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)
मंगळावर यान पोहोचले आहे. दुसरीकडे मात्र स्वत:च्या इच्छाशक्तीसाठी नरबळी देण्यात येत आहेत. असे चुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा का हवा ते सर्वांनाच समजण्याची गरज आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले. तसेच हरियाणातील घटनेवरही त्यांनी भाष्य केले.