दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात--: एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:00 PM2019-11-20T12:00:49+5:302019-11-20T12:06:54+5:30
अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात जखमी मनोज भोजने यांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे.
म्हसवड : समोरून येणाऱ्या दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीच्या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात पंढरपूर तालुक्यातील सुपली येथे झाला. अपघातातील मृत व्यक्ती म्हसवड येथील आहे.
याबाबत माहिती अशी, म्हसवड येथील अजिंक्य नंदकुमार ढोले, मनोज मुरलीधर भोजने व स्वप्नील भीमाशंकर टाकणे हे तिघेजण मंगळवारी दुपारी कामानिमित्त पंढरपूर येथे कार (एमएच ०२ एएच ४९७८) या चारचाकी वाहनातून निघाले होते. त्यांची गाडी पंढरपूर तालुक्यातील सुपलीजवळील उजनी कालव्याच्या पुलावर आली. समोरून अचानक आलेल्या दुचाकीस वाचविण्याच्या नादात चारचाकी ही त्या पुलावरील कठड्याला धडकली.
त्यामध्ये पुलाच्या कठड्यावरील लोखंडी बार तुटल्याने गाडी पुलावरून कालव्यात कोसळली. अपघातामध्ये अजिंक्य नंदकुमार ढोले (वय ३०) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नील टाकणे (२३) व पाठीमागे बसलेले मनोज मुरलीधर भोजने (५१) हे जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात जखमी मनोज भोजने यांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे.
एकंबेमधील शेतक-याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील एकंबे येथील शेतकरी पोपट बच्चाराम चव्हाण (वय ६०) यांनी सोमवारी रात्री मोहोट नावाच्या शिवारातील स्वत:च्या शेतातील चिकूच्या झाडाला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी दफ्तरी नोंद केली आहे.
दरम्यान, चव्हाण यांच्यावर सोसायटीचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेती कर्जाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.याबाबत माहिती अशी की, पोपट चव्हाण हे सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडले, ते सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा मुलगा उदय याने चुलत भाऊ संतोष चव्हाण याला मोबाइलवरून संपर्क साधून, वडिलांबाबत माहिती देऊन शोध घेण्यासाठी बोलविले. गावात शोध घेतल्यावर ते आढळून आले नाहीत. त्यामुळे दोघेजण शेतात शोधण्यासाठी गेले असता शेताच्या बांधावर असलेल्या चिकूच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्यांनी तातडीने कुटुंबीय आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस दफ्तरी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.
पोपट चव्हाण यांनी विकास सोसायटीकडून ठिबक सिंचन, म्हैस खरेदी आणि सामान्य कर्ज घेतले होते. तिन्ही कर्ज थकबाकीत होते. त्याचबरोबर जमिनीवरून त्यांनी काहीजणांकडून उसने पैसे घेतले होते. त्याची परतफेड करण्यावरून ते दोन-तीन दिवस तणावातच होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याचा आरोप मुलगा उदय चव्हाण याने केला आहे.