कारमध्ये पाण्याची बाटली ठेवताय? काळजी घ्या, नाहीतर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 05:56 PM2021-12-09T17:56:19+5:302021-12-09T17:57:54+5:30
पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बाटली घसरली अन् चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. अन्
संजय पाटील
कऱ्हाड : रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच; पण चार दिवसांपूर्वी कऱ्हाडनजीक घडलेला अपघात चालकांना विचार करायला लावणारा आहे. कारमध्ये बेजबाबदारपणे ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे काय घडू शकते, हे त्या अपघातातून दिसून आले. संबंधित अपघातात दोन युवक कायमचे जायबंदी झाले असून, सुदैवाने त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली आहे.
कऱ्हाडनजीक कारने दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात होण्यापूर्वी जे घडले ते महत्त्वाचे आहे. कार चालविणाऱ्या चालकाला तहान लागली. त्याने कार चालवितच पाठीमागच्या सिटवर असलेली पाण्याची बाटली घेतली. एक हाथ ‘स्टेअरिंग’वर ठेवून त्याने पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बेजबाबदारपणे ठेवलेली ती बाटली घसरली अन् क्षणात चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. त्यामुळे चालकाला ‘ब्रेक’ दाबता आला नाही. वेग नियंत्रित न झाल्यामुळे अखेर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत कार नाल्यात उलटली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले.
वरवर पाहता हा अपघात नेहमीच्या अपघातांसारखा वाटत असला तरी चालकाचा बेजबाबदारपणा त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अपघात झाला की बहुतांश जण वेळेला दोष देतात. रस्ता किंवा त्यावेळच्या परिस्थितीचे कारण समोर करतात. मात्र, बहुतांश अपघातांना चालकांचाच बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.
अकरा महिन्यांतील अपघात (जानेवारी ते ऑक्टोबरअखेर)
अपघात : ३१
मयत : २८
जखमी : १८
विनाहेल्मेट १५ दुचाकीस्वार ठार
कऱ्हाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत ११ महिन्यांत ३१ भीषण अपघात झाले. या अपघातांत मृत झालेल्यांपैकी १५ जण दुचाकीस्वार होते आणि त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याने अपघातात ते ठार झाल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच विनाहेल्मेट प्रवास करणारे अनेक दुचाकीस्वार अपघातांमध्ये जखमी झाले आहेत.
सिटबेल्ट लावायचाही कंटाळा
कऱ्हाडच्या हद्दीतील एकूण अपघातांपैकी १३ अपघातांत कारचा समावेश होता. त्यापैकी दोन कारचालक केवळ सिटबेल्ट न घातल्यानेच मृत्युमुखी पडल्याचे पंचनाम्यावेळी पोलिसांना दिसून आले आहे. बहुतांश कारचालक वाहन चालविताना सिटबेल्ट लावायचा कंटाळा करतात. परिणामी, अपघातात त्यांना गंभीर दुखापत होते. अथवा दुर्दैवी मृत्यू ओढवतो.
कऱ्हाडच्या हद्दीतील अपघात (२०२१ ऑक्टोबरअखेर)
२०१४ : १२५
२०१५ : ४३
२०१६ : ७६
२०१७ : ६१
२०१८ : ५४
२०१९ : ४१
२०२० : ४४
२०२१ : ३१
का होतात अपघात..?
- अप्रशिक्षित वाहनचालक
- चालकाचा अति आत्मविश्वास
- मद्यप्राशन केलेला चालक
- इंडिकेटर न लावणे
- चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’
- असुरक्षितरीत्या वाहन पार्किंग
- रिफ्लेक्टर, रेडीअम, टेललाईट नसणे
अपघाताची कारणे
बेजबाबदार चालक : ४६ टक्के
रस्त्याची दुरवस्था : २१ टक्के
वातावरण : ९ टक्के
नादुरुस्त वाहन : १३ टक्के
इतर : ११ टक्के