कोरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा आकस्मिक
By admin | Published: October 28, 2015 10:21 PM2015-10-28T22:21:04+5:302015-10-29T00:17:33+5:30
मृत्यू कारण अस्पष्ट : शाळा प्रशासनावर नातेवाइकांचा आरोप
कोरेगाव : येथील छत्रपती शिवाजी केंद्रीय आश्रमशाळेतील विद्यार्थी अनिकेत भीमराव बनसोडे (वय १४, रा. पुसेगाव) याचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलीस ठाण्यात मात्र ‘आकस्मिक मृत्यू’ अशीच नोंद झाली आहे. अनिकेत बनसोडे हा आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. तेथे तो आजारी पडल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र उपचाराला शरीर साथ देत नसल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सातारा येथे खासगी आणि शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र आजाराचे व्यवस्थित निदान न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी प्राथमिक नोंद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात
आला आहे. दरम्यान, दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाइकांची भेट घेतल्याने या
घटनेस वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)
आक्रोश आणि आरोप
अनिकेतच्या निधनामुळे नातेवाइकांनी आक्रोश केला. तसेच माध्यमांशी बोलताना आश्रमशाळेवर हलगर्जीपणाचे आरोपही केले. तथापि, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाहीत. त्याला ‘सेप्टीसेमिया’ नावाचा आजार झाल्याचा संशय होता, असे डॉक्टरांनी सांगितले. या आजारात शरीरावरील जखम बरी न होता संसर्ग पसरत जातो. अनिकेतला प्रतिजैविके देण्यात येत होती. आश्रमशाळेतच काम करताना त्याला दुखापत झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.