जवान अमोल पवारचा अपघाती मृत्यू
By admin | Published: July 6, 2014 12:24 AM2014-07-06T00:24:51+5:302014-07-06T00:32:14+5:30
वेखंडवाडीवर शोककळा : सुटी संपवून परतत असताना रेल्वेतून पडून अपघात
तारळे : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) कार्यरत असणारा वेखंडवाडी, ता. पाटण येथील जवान अमोल मुरलीधर पवार (वय २५) हा सुटी संपवून दिल्ली येथे सेवेत रूजू होण्यासाठी परतत असताना त्याचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे वेखंडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अमोलने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर २००५ मध्ये तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाला. पंधरा दिवसांपूर्वी तो सुटीवर गावी आला होता. सुटी संपवून दिल्ली येथे सेवेत हजर होण्यासाठी तो निघाला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. ग्वाल्हेर ते आग्रा दरम्यान त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. बुधवार, दि. २ रोजी अपघाताची माहिती मिळाल्यापासून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. शुक्रवार, दि. ४ रोजी रात्री साडेआठ वाजता अमोलचे पार्थिव गावी आणण्यात आले. ‘अमोल पवार अमर रहे’च्या घोषणा देत फुलांनी सजविलेल्या गाडीत पार्थिव देह ठेवून गावातून शोकफेरी काढण्यात आली. पार्थिव घराजवळ येताच कुटुंबीयांनी अक्षरश: हंबरडा फोडला. रात्री साठेआठच्या सुमारास पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय औद्योगिक दलाचे अधिकारी शामराज यादव, प्रवीण काकडे, माजी आमदार शंभूराज देसाई, सेवा दलातील निवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, तारळे परिसरातील सर्व राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)