दुष्काळी भागातील सिने निर्मात्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:15+5:302021-02-05T09:06:15+5:30
वडूज : येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील हॉटेल व्यावसायिक विजय हणमंत बागल (वय ४२) यांना रस्ता ओलांडताना वडूज-दहिवडी रस्त्यावर ...
वडूज : येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील हॉटेल व्यावसायिक विजय हणमंत बागल (वय ४२) यांना रस्ता ओलांडताना वडूज-दहिवडी रस्त्यावर भरधाव दुचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता झाला.
याबाबत माहिती अशी की, यलमरवाडी ता. खटाव हे मूळ गाव असणारे विजय बागल यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यात शेती असूनही पाण्याअभावी सर्वस्वी दुष्काळ जाणवल्याने कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी २०१५ पूर्वी मुंबईमध्ये टॅक्सी व्यवसाय सुरू केला. त्यानंतर गावी यलमरवाडी येथे येऊन शेतीबरोबरीने पोल्ट्री व शेळीपालन व्यवसाय सुरू केला. चित्रपट क्षेत्राची आवड असल्याने विजय बागल यांनी काही काळ निर्माता व्यवस्थापक म्हणूनही काम केले. त्यानंतर मराठी कलाकारांसोबत तालुक्यातील कलाकारांना व वडूजमधील मित्रमंडळींना बरोबर घेऊन ‘सावी’ हा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला. बहुतांश शूटिंगही वडूजसह जिल्ह्यात झाले.
लाॅकडाऊनमध्ये सेन्साॅरकडे हा चित्रपट अडकून पडला. त्यांनी वडूज-दहिवडी रस्त्याकडेला असलेल्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात हाॅटेल व्यवसाय सुरू केला. रविवार दि. २४ रोजी स्वामी समर्थ मंदिर परिसरात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विजय हणमंत बागल हे रस्ता ओलांडताना त्यांना वडूज-दहिवडी मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते बेशुद्ध झाले. वडूजमध्ये प्राथमिक उपचार करून बागल यांना अधिक उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवार दि. २५ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, सहा वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
आयकार्ड फोटो
२५विजय बागल