कडीकोयंड्याच्या दाराशिवाय निवासाची सोय ; घर भाड्याने देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 04:35 PM2020-01-30T16:35:30+5:302020-01-30T16:41:16+5:30

निसर्गदत्त निर्माण झालेली भावना खुलेपणाने व्यक्त करून तृतीयपंथी म्हणून वावरणं अनेकांना अडचणीत आणत आहे. रात्रीच्या अंधारात प्रेम दर्शविणारे अनेकजण दिवसा शेजारून गेले तरीही बघत नाहीत, अशी अवस्था आहे. वासनेसाठी तृतीयपंथीयांचा स्वीकार करणाऱ्यांनीच त्यांना डोक्यावर छत मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे.

Accommodation without door lock; Refuse to rent a house | कडीकोयंड्याच्या दाराशिवाय निवासाची सोय ; घर भाड्याने देण्यास नकार

कडीकोयंड्याच्या दाराशिवाय निवासाची सोय ; घर भाड्याने देण्यास नकार

Next
ठळक मुद्दे गुरू-शिष्य परंपरेचा आधार : कुटुंबाने नाकारल्यानंतर केवळ समपंथीयांचीच सोबत

प्रगती जाधव - पाटील ।

सातारा : समाजाने स्वीकृतीचा हात न दिल्याने तृतीयपंथीयांचे खुलेपणाने जगणे अद्यापही खडतर असेच आहे. कडीकोयंड्याच्या दाराशिवाय अनेकजणांना झोपडपट्टीमध्ये आसरा मिळतो. गुरू-शिष्य परंपरेत राहून परस्परांचे आधार बनलेत तर काही आपली ओळख लपवून सामान्यांसारखे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

निसर्गदत्त निर्माण झालेली भावना खुलेपणाने व्यक्त करून तृतीयपंथी म्हणून वावरणं अनेकांना अडचणीत आणत आहे. रात्रीच्या अंधारात प्रेम दर्शविणारे अनेकजण दिवसा शेजारून गेले तरीही बघत नाहीत, अशी अवस्था आहे. वासनेसाठी तृतीयपंथीयांचा स्वीकार करणाऱ्यांनीच त्यांना डोक्यावर छत मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्यांना घर मिळालं तर आपलं बिंग फुटेल ही सामान्यांची भीती! त्यांच्या या भीतीपोटी तृतीयपंथीयांना पैसे असूनही चांगल्या वसाहतीत राहायला घर मिळत नाही.

सामाजिक बदलाच्या गप्पा मारणारे तृतीयपंथीयांचा स्वीकार करताना कोसोदूर असतात. याउलट समाजाने उघडपणे झिडकारलेल्या अन् वेश्या व्यवसाय करणाऱ्यांकडून त्यांना सुरक्षितता मिळते. रात्री-अपरात्री मदतीसाठी धावाधाव करणं, त्यांच्यासाठी नित्याचेच आहे. सर्वांनी आपल्याला स्वीकारावं, अशी त्यांची इच्छा नाही; पण जे स्वेच्छेने स्वीकारतायत त्यांनातरी हिणवू नका, असे त्यांचे म्हणणे आहे.

मूलभूत सुविधांची वानवा
तृतीयपंथीयांची राहण्याची सोय झाली तर त्यांना वीज, पाणी, स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. बहुतांशदा एखाद्या झोपडपट्टीत त्यांच्या निवासाची सोय होते; पण त्याला कडीकोयंडा असेलच याची शाश्वती नाही. अनेकदा झोपडपट्टीतील मद्यपी येता-जाता त्यांच्या दारावर लाथा मारून पुढे जातात. एखादा दिवस वगळला तर हा त्रास त्यांच्यासाठी नित्याचाच झाला आहे.

शौचालयात होतोय अत्याचार
दिवसभर अनेक कामांच्या निमित्तानं तृतीयपंथीयांचं वावरणं होतं. काहीदा त्यांना सार्वजनिक शौचालयाचा वापरही करावा लागतो. महिलांचे शौचालय वापरायला त्यांना बंदी आहे. तर पुरुषांच्या शौचालयात गेलं की त्यांच्या मागे येऊन काही पुरुष त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती निशा माने यांनी दिली.
 

लोक आम्हाला नावं ठेवतील
तृतीयपंथीयांविषयी कमालीचे गैरसमज समाजात असल्याने त्यांना आपल्या सोबत राहण्यास ठेवायला कोणी फार इच्छुक नसतात. त्यातूनही चांगल्या वसाहतीत त्यांना खोली भाड्याने मिळालीच तर संबंधित घरमालकाला टीकेची झोड सोसावी लागते. असल्या लोकांना कशाला आपल्यात ठेवता, असा सल्लाही देतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडून दुप्पट भाडेही घेतले जाते.

तृतीयपंथीयांना कायद्याने समानतेची वागणूक देण्याचे निर्देशित केले असले तरीही प्रत्यक्ष समाजात तसे आचरण दिसत नाही. त्यांच्यावर होणाºया अत्याचारावर कोणाकडेही दाद मागता येत नाही. उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोनही बदलणं अपेक्षित आहे.
- अमर भोंडवे, संग्राम-मुस्कान संस्था, संपर्क अधिकारी
 

Web Title: Accommodation without door lock; Refuse to rent a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.