पोलिसांना माहिती दिली म्हणून मटका चालकांचा हल्ला-कल्याण रिसॉर्टमध्ये राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:24 PM2018-03-26T21:24:33+5:302018-03-26T21:24:33+5:30
सातारा : मटका अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन आठ मटका चालकांनी जुन्या एमआयडीसीतील हॉटेल कल्याण रिसॉर्टमध्ये राडा केला.
सातारा : मटका अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन आठ मटका चालकांनी जुन्या एमआयडीसीतील हॉटेल कल्याण रिसॉर्टमध्ये राडा केला. व्यवस्थापकावर हल्ला करुन वस्तूंची मोडतोड करत रविवारी रात्री दहशत माजवली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सातारा पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून मटका अड्ड्यांवर छापा सत्र सुरू केले आहे. देगाव फाटा परिसरातील एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले होते. या मटका कारवाईची माहिती कल्याण रिसोर्टचे व्यवस्थापक प्रकाश भोईटे देत असल्याच्या संशयावरून अमर बनसोडे, मनोज बनसोडे (दोघे रा. वनवासवाडी, ता. सातारा) व इतर पाच-सहाजण रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण रिसोर्टमध्ये घुसले.
कॅश काऊंटरवर जाऊन व्यवस्थापक प्रकाश भोईटे यांना ‘तू मटका धंद्याची पोलिसांना टीप दिल्याने धंदा मोडला,’ असे म्हणत मारहाण केली. तसेच हॉटेलच्या साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी मयूर आनंदराव कणसे (वय २७, रा. श्रीपाद सोसायटी, संभाजीनगर) यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.