‘वाडी’ नावामुळे म्हणे, ‘शुभमंगल’ अडतंय!
By admin | Published: February 15, 2015 12:53 AM2015-02-15T00:53:15+5:302015-02-15T00:58:10+5:30
पुरोगामी साताऱ्यावर परंपरेचा पगडा : जिल्ह्यात ३९१ वाड्या; पाटण तालुक्यात सर्वाधिक तर जावळी, खंडाळ्यात संख्या कमी
संजय पाटील ल्ल कऱ्हाड
जिल्हा परिषदेकडे गावांच्या नाव बदलाचे सध्या सहा प्रस्ताव धूळखात पडलेत. संबंधित गावांची नावे बदलण्यासाठीची वेगवेगळी कारणे आहेत; पण ‘अडलेलं शुभमंगल’ हे सर्वांचेच मुख्य कारण आहे. गावाच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविण्यात अडचणी येत असल्याचं बहुतांश गावांचं म्हणणं आहे. तसेच ‘वाडी’ म्हणताच सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असेही काही ग्रामस्थ सांगतायत.
वाई तालुक्यातील ‘चोराचीवाडी’ या महसुली गावाचा काही दिवसांपूर्वीच नावबदल झाला. चोराचीवाडी ‘आनंदपूर’ बनलं. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यातील ज्या-ज्या गावांनी नाव बदलाचे प्रस्ताव पाठविले त्यांच्या आशाही पल्लवित झाल्या. जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करताना संबंधित गावांनी नाव बदलाची वेगवेगळी कारणे दिली आहेत. मात्र, ज्यावेळी ‘लोकमत’ने नाव बदलामागील कारणांचा शोध घेतला, त्यावेळी ‘खासगी’तील अन्य काही कारणं समोर आली. ‘वाडी’शी सोयरिक करण्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे बहुतांश वाड्यांना नाव बदलायचंय, हे मुख्य कारण सध्या समोर येत आहे.
जिल्ह्यात जावळी तालुक्यात १६, कऱ्हाड तालुक्यात ५८, खंडाळा १६, खटाव ४४, कोरेगाव ५०, माण २०, पाटण ७४, फलटण ४१, सातारा ५० व वाई तालुक्यात २२ वाड्या आहेत. या गावांच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविताना त्यांच्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘वाडी’ असल्यामुळेच मुला-मुलींना नकार दिला जातो.
मुला-मुलींचे पालक आमच्याकडे नोंदणीसाठी आल्यानंतर काहीजण आवर्जून ‘वाडीतील स्थळ सुचवू नका,’ असेही म्हणतात. कऱ्हाडातील मधुरा वधू-वर सूचक केंद्राचे प्रमुख महेशकुमार कुत्ते सांगत होते, ‘वाडीतील मुले-मुलीही उच्चशिक्षित, संस्कारित आहेत. मात्र, तरीही ‘वाडी’चे कारण सांगून अनेकजण अशी स्थळं डावलतात. वाडीशी सोयरिक न करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात आहे. आम्ही कितीही समजून सांगितलं तरी मुला-मुलींचे आई-वडील वाडीत सोयरिक करण्यास तयारच होत नाहीत.’