सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

By सचिन काकडे | Published: December 20, 2023 03:55 PM2023-12-20T15:55:34+5:302023-12-20T15:56:24+5:30

छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत

According to Mahavitaran Go Green scheme, Satarkar saved 14 lakhs in electricity bill! | सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

सातारा : महावितरणच्या वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करीत जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या ग्राहकांची वार्षिक १३ लाख ८५ हजार रुपयांची बचत झाली असून, या योजनेत ग्राहकांचा सहभागही वाढू लागला आहे.

महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येते. सोबतच ‘एसएमएस’द्वारेदेखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे तातडीने बिल भरणा करणे सोपे झाले आहे.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठीदेखील महत्त्वाची आहे. या योजनेत पुणे प्रादेशिक विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला आहे. हे ग्राहक ऑनलाइन वीज बिल भरत असल्याने प्रत्येक ग्राहकाची मासिक १० तर वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. या ग्राहकांची एका वर्षात तब्बल १३ लाख ८३ हजार रुपयांची बचत झाली आहे.

  • वीजग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाइल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  • ‘गो ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते.
  • संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही उपलब्ध होऊ शकते.

Web Title: According to Mahavitaran Go Green scheme, Satarkar saved 14 lakhs in electricity bill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.