ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेचा हिशेब करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:59+5:302021-09-21T04:43:59+5:30
कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांना सोमवारी पहाटे कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, ...
कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांना सोमवारी पहाटे कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असून, या घोटाळ्याबाबत मंगळवारी ईडीकडे कागदपत्रे देणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार ठाकरे आणि पवार हे दोघे मिळून चालवतात. त्यामुळे तेच या सर्व घोटाळ्यांना जबाबदार आहेत. मला माझ्या मुलूंड येथील घरी स्थानबद्ध का करण्यात आले? कोल्हापूरला जाण्यावर बंदी का घातली? माझ्यावर हल्ला होणार होता तर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने कारवाई का केली नाही? गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून, त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थ मंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरू झाली असून, मी अधिक माहिती मागवली आहे, ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरू आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करीत आहेत. हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी दिली जाते. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही? सध्या या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे.
- चौकट
डांबून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा !
जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोल्हापुरात प्रतिबंध केल्याचा आदेश पोलिसांनी मला दिला. मात्र, या आदेशात मला मुंबईतून बाहेर पडू देऊ नका, कोंडून ठेवा, असा कसलाच उल्लेख नाही. गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही, हा ठाकरे सरकारचा कसला आदेश आहे? मला डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
- चौकट
... ही तर ठाकरे सरकारची ठोकशाही!
मला घरच्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आले होते. कार्यालयाबाहेर दोनशे पोलीस तैनात करण्यात आले. त्या पोलिसांना मी हात जोडून आदेश दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी मला परवानगी दिली. मात्र, ही ठाकरे सरकारची ठोकशाही असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर मला धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कऱ्हाडच्या रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
फोटो : २०केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडात स्थानबद्ध केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला.