साताऱ्यात राष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठीच्या प्रशिक्षण केंद्राला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:17 PM2022-09-28T17:17:15+5:302022-09-28T17:49:18+5:30

येत्या १ डिसेंबरपासून केंद्र सुरू होत असून, सुरुवातीला किमान ३० मुले येथे सराव करू शकतात.

Accreditation of training center for national level sports at Satara | साताऱ्यात राष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठीच्या प्रशिक्षण केंद्राला मान्यता

संग्रहित फोटो

Next

सातारा : मैदानी खेळाडूंच्या कठोर मेहनतीला सुविधा व प्रशिक्षणाची जोड मिळाली तर सातारी झेंडा अटकेपार करतील, असे अनेक खेळाडू जिल्ह्यात आहेत. त्यांना केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून चांगली ताकद मिळणार आहे. योजनेअंतर्गत मैदानी खेळासाठी एका प्रशिक्षण केंद्रासाठी मान्यता मिळाली आहे. येत्या १ डिसेंबरपासून केंद्र सुरू होत असून, सुरुवातीला किमान ३० मुले येथे सराव करू शकतात.

जिल्ह्याच्या दुर्गम भागातूनही अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यश मिळवले आहे. या खेळाडूंना घरची परिस्थिती बिकट असल्याने अनेक अडथळे पार करावे लागले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेकडो खेळाडू गाव, तालुका, जिल्हास्तरावर मेहनत घेत आहेत. त्यांना तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा, क्रीडा साहित्याची गरज आहे. घरची परिस्थिती बिकट असूनही जमेल तसा पैसा उभारून खेळाडू सराव करत असतात. तथापि, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्यास त्यानंतर मोठा खर्च येतो. त्या दर्जाचे प्रशिक्षण जिल्ह्यातच मिळण्याची गरज आहे. त्यासाठी सातारा येथील जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या वतीने मैदानी, बॅडमिंटन, हॉकीची प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते.

देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे येत्या चार वर्षांमध्ये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यापैकी जिल्ह्यासाठी तीन प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये मैदानी खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सुरुवातीला ३० खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर प्रशिक्षण केंद्र दि. १ डिसेंबरपासून जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळ व सायंकाळ सत्रात सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, क्रीडा साहित्य, तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गुणवंत खेळाडूंना जिल्ह्यातच चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळू शकतील.

प्रशिक्षण केंद्रासाठी सात लाखांचे अनुदान

सातारा जिल्ह्यास प्रशिक्षण केंद्रासाठी सात लाखांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. या रकमेतून अत्याधुनिक सुविधा, क्रीडा साहित्य, तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करता येणार आहेत.

Web Title: Accreditation of training center for national level sports at Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.