‘कृष्णा’प्रकरणी तेराजणांवर दोषारोपपत्र

By admin | Published: May 12, 2017 10:25 PM2017-05-12T22:25:44+5:302017-05-12T22:25:44+5:30

‘कृष्णा’प्रकरणी तेराजणांवर दोषारोपपत्र

Accusation on Teerajan for 'Krishna' | ‘कृष्णा’प्रकरणी तेराजणांवर दोषारोपपत्र

‘कृष्णा’प्रकरणी तेराजणांवर दोषारोपपत्र

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : बोगस कर्जप्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असणाऱ्या कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी संचालक व कामगार अशा तेराजणांवर शुक्रवारी येथील फौजदारी न्यायालयात कऱ्हाड शहर पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात एकूण ३४ आरोपी असून, दाखल केलेले दोषारोपपत्र तब्बल दहा हजार पानांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे, माजी संचालक संभाजीराव जगताप, सर्जेराव लोकरे, अशोक जगताप, उदयसिंंह शिंंदे, बाळासाहेब निकम, चंद्रकांत भुसारी, महेंद्र मोहिते, वसंत पाटील, कर्मचारी राहुल देसाई व संभाजी भंडारी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. याबाबत ऊस तोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. कृष्णा कारखान्याच्या २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येकी ७ लाख रुपयांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक आॅफ इंडियाकडून पाठविण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही संबंधित नोटीस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. संबंधित शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात १३ फेब्रुवारी रोजी अविनाश मोहिते यांना तर १४ फेब्रुवारी रोजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलला आठ संचालक, २० एप्रिलला तत्कालीन कार्यकारी संचालक व २६ एप्रिल रोजी तीन कामगारांना अटक करण्यात आली. सध्या अटकेत असणारे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: Accusation on Teerajan for 'Krishna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.