दोन खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; चार वर्षांनंतर कारवाई, सात दिवस पोलिस कोठडी
By दत्ता यादव | Published: April 29, 2023 02:48 PM2023-04-29T14:48:15+5:302023-04-29T14:48:30+5:30
जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली
सातारा : दोन खून केल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून पसार असलेल्या सराईत आरोपीला न्यायालयातील पोलिसांनी साताऱ्यात शिताफिने पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.
रोशन अविनाश उर्फ अँडीसन भोसले (वय ३९, रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, ता. माळशीरस, जि. सोलापूर, सध्या रा. कापशी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोशन भोसले याने २०२० मध्ये फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन खून केले होते. या खुनाच्या आरोपासह त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, राष्ट्रीय अपत्ती कायद्याचे उल्लंघन करणे यासारखे गंभीर गुन्हे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून तो फलटण पोलिसांना गुंगारा देत होता.
शुक्रवारी सायंकाळी तो जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकामध्ये जिल्हा न्यायालयात असलेले सहायक फाैजदार संतोष कदम, सहायक फाैजदार संजय पाटील, हवालदार चंद्रकांत धापते, काकासाहेब कर्णे यांचा समावेश केला. या पथकाने रोशन भोसलेवर दिवसभर पाळत ठेवली.
सायंकाळी तो न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या शेजारून चालत निघाला होता. त्यावेळी या पथकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर त्याला फलटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले असता त्याला ३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटकपूर्व जामिनासाठी ‘तो’ न्यायालयात..
रोशन भोसले हा अटकपूर्व जामीन घेण्यासाठी न्यायालयात आला होता. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो तेथून निघाला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चार वर्षांपासून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जीवाचे रान केले. अखेर तो सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.