अॅसिडचा टेम्पो उलटल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:30+5:302021-06-09T04:48:30+5:30
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर बेदरकारपणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून अॅसिडचा टेम्पो पलटी होऊन सोबत असणाऱ्या एकाला जखमी केल्याप्रकरणी ...
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर बेदरकारपणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून अॅसिडचा टेम्पो पलटी होऊन सोबत असणाऱ्या एकाला जखमी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पिकअपचालक महेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवार, दि. ३० मे रोजी घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, महेश रामचंद्र पाटील (वय ४०, रा. श्रीकृष्णा हौसिंग सोसायटी, आंबा चौक, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) आणि हर्षवर्धन महेश पाटील हे दोघेजण दि. ३० मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिकअप (एमएच १० - सीआर २७९०) घेऊन पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता त्यांच्या टेम्पोमध्ये ब्रोमीन ॲसिड होते. महेश हा बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वेगाने पिकअप चालवत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाढे गावच्या हद्दीत असणाऱ्या विठ्ठल कामत हॉटेलसमोर आले असताना पिकअप पलटी झाला. यात हर्षवर्धन जखमी झाला तर पिकअपमधील रासायनिक साहित्याचे पाच लाख रुपयांचे, तर पिकअपचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, यावेळी महामार्गावरून पिवळसर रंगाच्या धुराचे लोट पसरले होते, तसेच ब्रोमीन ॲसिडची दुर्गंधीही पसरली होती. यामुळे अनेकांना त्रासही झाला होता. याप्रकरणी दि. ७ जून रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल हेमंत महाले यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार तोरडमल करत आहेत.