पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

By दत्ता यादव | Published: January 16, 2024 07:16 PM2024-01-16T19:16:59+5:302024-01-16T19:17:28+5:30

पोलिसांना पंधरा दिवस दिला गुंगारा

Accused who escaped from police custody was finally found, arrested from Satara bus station | पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

सातारा : पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सूरज हणमंत साळुंखे (वय २२, सावली, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळुंखे याला ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी त्याला न्यायालयातून कारागृहात नेण्यात येत होते. कारागृहासमोर आणल्यानंरत त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी सोडल्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. कारागृहासमोरूनच चोरटा पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. 

पोलिसांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत होते. दरम्यान, सूरज साळुंखे हा मंगळवारी दुपारी सातारा बस स्थानकात आला असल्याची माहिती हवालदार दादा राजगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने बस स्थानकात जाऊन त्याला ताब्यात घेतले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक होताच सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हे दोघे करत होते रात्रंदिवस तपास..

सूरज साळुंखे हा सराईत आहे. त्याच्या नावावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. बऱ्याचवेळा तो कारागृहात गेला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो चोरी करत असे. असा संशयित आरोपी पळून गेल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार दादा राजगे, चंद्रकांत माने यांनी रात्रंदिवस तपास केला. रात्री-अपरात्री त्याचे घर, नातेवाईक, गावात जाऊन त्याचा शोध घेतला. तसेच अनेक ठिकाणचे सीसीटीव्हीही त्यांनी तपासले. सतत पाठपुरावा ठेवल्यामुळे संशयित सूरज साळुंखे अखेर त्यांच्या हाती लागला.  

Web Title: Accused who escaped from police custody was finally found, arrested from Satara bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.