दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत -भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:09 PM2019-04-06T12:09:29+5:302019-04-06T12:10:15+5:30
खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली
शिरवळ : खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली.
खंडाळा येथे २००९ मध्ये घरफोडी झाली होती. यावेळी खंडाळा पोलिसांनी चोरीप्रकरणी आंबळे, ता.पुरंदर जि. पुणे येथील गणेश पांडुरंग दरेकर याला जेरबंद केले होते. दरम्यान दरेकर हा न्यायालयामधून जामिनावर मुक्त झाल्यापासून न्यायालयात हजर राहत नव्हता. त्याच्यावर वेळोवेळी अटक वाँरट काढण्यात आले होते. मात्र, तो सापडत नव्हता. गुन्हा घडल्यापासून त्याचे राहते मूळगाव त्याने सोडले होते.
दरम्यान , सासवड ता. पुरंदर येथे कचेरीमध्ये दस्तऐवज करण्यासाठी गणेश दरेकर येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हणुमंत गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गणेश दरेकर याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश कदम ,पोलीस हवालदार भगवंत मुठे , सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सुभाष धुळे ,बालाजी वडगावे यांच्या पथकाला सूचना केल्या. या पथकाने सासवड ता. पुरंदर येथे सापळा लावला. गणेश दरेकर येताच या टीमने झडप घालून त्याला अटक केली. याबाबत अधिक तपास हवालदार सचिन वीर हे करत आहेत.
भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद -लवंगमध्ये आढळला होता दोष
सातारा : फलटणच्या किराणा स्टोअर्समध्ये अप्रमाणित अन्नसाठा आढळल्याने फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये दुकानदारास व पुरवठादारास प्रत्येकी ३ हजार दंड व १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती सातारचे सहायक आयुक्त (अन्न) शि.वा. कोडगीरे यांनी दिली.
तत्कालीन अन्न निरीक्षक बी.एम. ठाकूर सातारा यांनी ५ फेब्रुवारी २0१0 रोजी सुनील जयसिंगराव ढेंबरे, मे. सरस्वती किराणा स्टोअर्स, कसबा पेठ, फलटण यांच्या दुकानातून अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये लवंग हा अन्नपदार्थ विश्लेषणासाठी घेतला होता. लवंगामध्ये तपासणीअंती दोष आढळून आल्याने अप्रमाणित घोषित करण्यात आला होता. यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या खटल्यामध्ये दुकानदार सुनील जयसिंगराव ढेंबरे व पुरवठादार व पॅकर शाम धरमचंद अगरवाल यांना प्रत्येकी दंड रु. ३ हजार ठोठावला असुन प्रत्येकी १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी शि.वा. कोडगीरे, सहायक आयुक्त (अन्न) सातारा यांचे मार्गदशनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मे.स.पवार व विकास सोनवणे यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता.