आरोपीची ‘बोलती’ बंद; खाकीचा ‘पट्टा’ चालू!

By Admin | Published: July 6, 2016 11:35 PM2016-07-06T23:35:42+5:302016-07-07T00:49:52+5:30

‘क्या करे, क्या ना करे’ हाच प्रश्न : संशयिताला ‘शेकताना’ आता भाजतायत पोलिसांचेच हात; वेगवेगळ्या क्लृप्त्या येतायत अंगलट -- लोकमत विशेष

The accused's 'talk' is closed; Khakee's 'lease' on! | आरोपीची ‘बोलती’ बंद; खाकीचा ‘पट्टा’ चालू!

आरोपीची ‘बोलती’ बंद; खाकीचा ‘पट्टा’ चालू!

googlenewsNext

संजय पाटील -- कऱ्हाड  -‘पोलिस खातं जे बोलतं ते करत नाही आणि जे करायचं ते बोलून दाखवत नाही,’ असं म्हणतात. पण कऱ्हाडात सध्या याच्या नेमकं उलट चाललंय. संशयितांना ‘बोलतं’ करण्यासाठी पोलिस वापरीत असलेल्या क्लृप्त्यांचा सध्या चांगलाच गाजवाजा होतोय. त्यातून संशयिताऐवजी पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात जायला लागलेत. वास्तविक, ‘थर्ड डिग्री’चा वापर पोलिसांसाठी रोजचाच; पण आरोपींना ‘शेकताना’ सध्या पोलिसांचेच हात भाजायला लागलेत, हे विशेष.
प्रत्येक महत्त्वाच्या पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येते. गुन्हे शाखा म्हणून या पथकाची ‘विशेष’ ओळखही असते. संबंधित शाखेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना प्रभारी अधिकारी अलिखित निकष वापरतात. अनुभवींबरोबरच तरुण कर्मचाऱ्यांची अशा शाखेमध्ये नेमणूक होते. तपास हे आव्हानात्मक काम असल्याने त्या कामासाठी तरुण आणि धाडसी कर्मचारी आवश्यक असतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना तपासाचा पूर्वानुभव असणेही तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. संबंधित सर्व अलिखित निकषात पात्र असलेला कर्मचारीच गुन्हे शाखेत ‘फॉर्मात’ असतो. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी हालचाली, दैनंदिन घडामोडी, अवैध व्यवसाय या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्याबरोबरच कोणता आरोपी कोणत्या गुन्ह्यात सहभागी असू शकतो, याचा अंदाजही गुन्हे शाखेला असतो. त्यामुळे एखादा गुन्हा घडला किंवा गुन्ह्यांबाबत खबरीकडून ‘टीप’ मिळाली की, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागतात. संबंधित संशयिताला गाठून त्याची ‘कुंडली’ काढण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. संशयित नवखा असेल आणि त्याने गुन्हा केला असेल तर तो पोलिसांच्या भीतीने लगेच गुन्हा कबूल करतो. मारहाणीबरोबरच अनेक क्लृप्त्या लढवून आरोपीकडून खरी माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर यापूर्वीही काहीवेळा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्या वादावर त्यावेळीच पडदा पडला. सध्या मात्र पोलिसांची मारहाण हा चर्चेचा विषय बनत असून, संशयिताऐवजी पोलिसच कायद्याच्या कचाट्यात सापडतायत.


संशयितही होतात ‘इमोशनल’
संशयिताचं तोंड उघडण्यासाठी पोलिस मारहाण करीत असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. मात्र, मारहाणीबरोबरच संशयिताला भावनिक करण्याचा प्रयत्नही अनेकवेळा पोलिसांकडून होतो. कुटुंबीयांची आठवण सांगून किंवा जवळच्या व्यक्तीबद्दलची माहिती सांगून संशयिताला भावनाविवश केले जाते. ज्यामुळे भावनेच्या भरात संशयित पोलिसांना सर्व माहिती सांगून टाकतो.


गैरसमजातून मिळते माहिती

एखाद्या गुन्ह्यात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असेल तर त्यांच्याकडे वेगवेगळी चौकशी केली जाते. या चौकशीवेळी दोन्ही संशयितांना वेगवेगळी माहिती देऊन त्यांच्यात गैरसमज निर्माण केले जातात. या गैरसमजामुळेच संशयितांकडून खरी माहिती पोलिसांना मिळते.

कुटुंबातील व्यक्तीसमोर चौकशी
संशयित कसाही असला तरी त्याला कुटुंबातील एखादी व्यक्ती दिसली तरी तो तत्काळ भावनिक होतो, हे पोलिसांना माहिती असते. त्यामुळे त्याच्याकडून खरी माहिती काढून घेण्यासाठी काहीवेळा कुटुंबातील व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले जाते. त्या व्यक्तीसमोरच त्याच्याकडे चौकशी होते. कुटुंबातील व्यक्तीसमोर अनेकवेळा संशयित खरे बोलतात.


वर्दी अडकली नामुश्कीच्या गर्तेत!
या चार घटनांना मिळाला उजाळा !
दत्ता यादव ल्ल सातारा
खाकीवर वारंवार मारहाणीचे आरोप होत असल्याने ही खाकी आता नामुश्कीच्या गर्तेत अडकली आहे. सराईत गुन्हेगाराला ‘थर्ड डिग्री’ वापरून बोलते केले जाते. मात्र, संशयिताला मारहाणीचे निर्बंध घातल्यापासून पोलिसांवर प्रचंड बंधने आली; मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून ‘थर्ड डिग्री’चा वापर केला जात असल्याने पोलिस आणखीनच अडचणीत येत असल्याचे चित्र वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे.
खरंतर सराईत गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याला ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याशिवाय तो बोलतच नाही. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो, हे सर्वश्रूत आहे. म्हणे, पूर्वी एखाद्या संशयित पोलिसांच्या तावडीत सापडल्यास त्याला खाकी अक्षरश: फोडून काढत होती. केवळ ‘थर्ड डिग्री’च गुन्ह्याची उकल करण्याची पोलिसांची त्यावेळीची पद्धत होती. मात्र, अलीकडे या परिस्थितीत खूपच बदल झाला आहे. एखाद्या संशयिताला केवळ एक थप्पड मारली तरी तो पोलिसांच्या विरोधात न्यायालयात तक्रार करत असतो. त्यामुळे पोलिसांनाही आता काम करताना कायद्याची बंधने पाळावी लागत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातारा शहरात संशयितांना पोलिसांनी मारहाण केल्याच्या गंभीर चार घटना घडल्या आहेत. मात्र, यातूनही पोलिस धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सातत्याने पोलिस आरोपांच्या गर्तेत अडकत आहेत. ‘थर्ड डिग्री’च्या नावाखाली पोलिसांकडून होत असलेली छळवणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गुन्हा कबूल करायचा असेल तर आरोपीला गोंजारून, त्याला खायला -प्यायला घालून चालणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, हे कदाचित रास्तही असेल; मात्र जो खरोखर आरोपी नाही, अशांनाही त्याच नजरेतून पाहिले जात असेल तर सर्वसामान्यांचा रोष वाढणार. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांमधून पोलिसांनी बोध घेतला तरी अशा प्रकारच्या घटना टळू शकतील, असे बोलले जात आहे.

या चार घटनांना मिळाला उजाळा !
सहा महिन्यांपूर्वी साताऱ्यातील दोघांना चोरीच्या संशयावरून परजिल्ह्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या दोघांना एका लॉजवर नेऊन त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोपही झाला होता. या आरोपावरून संबंधित अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशीही सुरू झाली होती. दुसरी घटना साताऱ्यातील प्रतापसिंहनगरात घडली होती. पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी त्यांनाही ‘थर्ड डिग्री’चा वापर करून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. तसेच चोरीची दुचाकी असल्याच्या संशयावरून एका महाविद्यालयीन युवकालाही पोलिसांनी अशाच प्रकारे मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लक्ष्मीटेकडी सदर बझारमधील एका युवकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचाही आरोप झाला होता.

Web Title: The accused's 'talk' is closed; Khakee's 'lease' on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.