डोंगरावरच्या पांगाऱ्यात साकारतोय ‘रक्तात रंगला चुडा’
By admin | Published: March 29, 2015 11:18 PM2015-03-29T23:18:22+5:302015-03-30T00:11:03+5:30
सलग २५ वर्षे नाटक : श्री केदारनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
परळी : परळी खोऱ्यातील ठोसेघर पठारावर डोंगरावर वसलेल्या पांगारे गावातील देवतानाट्य मंडळ गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा जोपासत आहे. यावर्षी श्री केदारनाथ यात्रा सोहळा निमित्ताने ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे तीन अंकी नाटक बसविले आहे. हे नाटक मंगळवार (दि. ३१) मार्च रोजी सादर होणार असून, नाटक पाहण्यासाठी गावासह परळी पंचक्रोशीतील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजही दुर्गम, डोंगराळ असणाऱ्या भागात नाटक कला जिवंत ठेवण्याचे काम हे मंडळ करीत आहेत.साताऱ्यापासून २५ किलोमीटर असलेल्या ठोसेघर पठारावरील पांगारे या छोट्याशा गावात गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा चालू आहे. मंगळवारी श्री केदारनाथ यात्रा सोहळा होणार आहे. या यात्रेनिमित्त येथील देवतानाट्य मंडळ यांच्या आश्रयाखाली श्री समर्थ मित्र मंडळाने तुफान विनोदी, लावण्यांनी परिपूर्ण नटलेले असे तीन अंकी नाटक ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे नाटक होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता छबिना सोहळा, रात्री ११ वाजता पांगारे गावासह परिसरातील ढोल-लेझीम पथकांचे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच गावचे ग्रामदैवत असणाऱ्या केदारनाथ नवीन मंदिराच्या जीर्णोद्धरावेळी कार्यक्रमाची क्षणचित्रे पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विजय आकलेकरसह बेबी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी चार वाजता परिसरातील नामांकित पैलवानांच्या जंगी कुस्त्या होणार आहेत.
या मंडळानी यापूर्वी अनेक नाटके केली. यातील काही नाटके मुंबई येथे सभागृहात झाली आहेत. यामध्ये ‘रक्तात रंगला गाव, सख्खा भाऊ पक्का वैरी,’ महाराष्ट्राचा बहुरूपी, देखणी बायको दुसऱ्याची व यळकोट-यळकोट जयमल्हार अशी अनेक नाटके या मंडळाने सादर केली आहेत. यामुळेच या मंडळाची नाटके पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गर्दी होत असते. (वार्ताहर)
नाटकात तरुण वर्गाचा सहभाग
गावोगावी राजकारणाची निवडणुकीचा फिव्हर वाढत चालला आहे. ग्रामपंचायत निवडणूकही तोंडावर येऊन ठेपली आहे. भावकी-भावकीत राजकारण तापले आहे. परंतु या मंडळाने नाटक बसून गाव एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. तर या नाटकात सर्व तरुणवर्ग असून, सर्वजण तीस वर्षे वयोगटाच्या आतीलच आहेत. त्यामुळे या नाटकाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
१९५७ मध्ये आमच्या देवतानाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हे सलग २५ वे नाटक आहे. मी प्रथमच नाटकांमध्ये काम करीत आहे. मला काम करताना थोडी भीती वाटत असून, यातील मुख्य पात्र हे माझे असल्याने मला जास्तीत जास्त भीती वाटत आहे. परंतु नाट्य मंडळाने जे पात्र मला दिली आहे. ते मी व्यवस्थित पार पाडेन.
-दीपक जाधव, कलाकार, पांगारे