वाईत विनाकारण फिरणाऱ्या १६५ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:39+5:302021-05-08T04:40:39+5:30
वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी ...
वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी व चारचाकी धारकांवर धडक कारवाई करत आहेत. १६५ हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करून ५५ हजारांहून अधिक दंड वसूल करून ६३ वाहने जप्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर व नागरिकांवर धडक कारवाई केली जात असून, नागरिकांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करणार, असा इशारा वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात हाहाकार माजविला असल्याने शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी वाई शहरातील चौका-चौकात, रस्त्यावर नागरिक अनावश्यक आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन विनाकरण फिरत असताना आढळून आल्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी किसनवीर चौक, एसटी स्टँड परिसर, महागणपती चौक, भाजी मंडई सह्याद्रीनगर नाका आदी ठिकाणी धडक कारवाई केली. ही कारवाई सात दिवस चालू आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी कारवाईत भाग घेतला. अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसल्यावर कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
सध्या वाई शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोनोबाधित रुग्णांची वाढत असून, नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिस्थिती होऊन प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण फिरत आहेत, तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. महसूल, पोलीस, आरोग्य विभाग नगरपालिका, ग्रामपंचायती प्रशासन असे सर्वजण रात्रंदिवस वाई शहरासह तालुक्यातील गावांंमध्ये कोरोनाशी लढा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू असतानाही काही नागरिक कायद्यांचे उल्लंघन करून दुचाकीवरून विनाकारण पोलिसांच्या समोरून ये-जा करीत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन जरी रस्त्यावर त्यांचे काम प्रामाणिक करत असले, तरी या आवश्यक कामाला नागरिकांची साथ आवश्यक आहे. तरी नागरिकांनी कोरोनोसारख्या रोगावर मात करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोट..
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू असून, नागरिकांनी नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.
- आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस स्टेशन