२४० वाहनांवर कारवाई
By admin | Published: November 4, 2014 08:59 PM2014-11-04T20:59:52+5:302014-11-05T00:02:15+5:30
वाहतूक शाखा : दोन दिवस विशेष मोहीम राबवून २५ हजारांचा दंड वसूल
सातारा : शहर व परिसरातील चेन स्नॅचिंग, वाहन चोरी तसेच भरधाव वाहन चालविणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी वाहतूक शाखेने सलग दोन दिवस अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी तब्बल दोनशे चाळीस वाहनांवर कारवाई करून वाहनचालकांकडून २५ हजार दंड वाहतूक शाखेने वसूल केला.
सातारा शहरामध्ये वेगात वाहन चालविणाऱ्या रोडरोमीओंचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: सायंकाळच्या सुमारास राजवाड्याहून पोवईनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या राजपथावर हे प्रकार नेहमीच घडत आहेत. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याकडे तक्रारींचा ओघ वाढला. त्यामुळे कानगुडे यांनी शहरात वाहनांची अचानक तपासणी मोहिम राबविली.
या मोहिमेध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे यांच्यासह दोन अधिकारी व १४ कर्मचारी सहभागी झाले होते. शहरामध्ये दर आठवड्याला अचानकपणे ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे श्रीगणेश कानुुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
युवकांवर लक्ष केंद्रित
पोवईनाका, विसावानाका, बसस्थानक, राजवाडा, रविवार पेठ, कमानी हौद, राधिका चौक, मोळाचा ओढा या परिसरांचा त्यामध्ये समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरी व मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या मोहिमेला विशेष महत्व आहे. सकाळी ११ ते एक व सायंकाळी चार ते आठ या वेळेत ही तपासणी करण्यात आली. यामध्ये युवक वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. नंबर प्लेट नसणे, चुकीच्या पद्धतीने नंबरप्लेट लावणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वेगात वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या.
दोन दिवसांत तब्बल ८५० वाहने तपासण्यात आली. त्यातील २४० जणांवर कारवाई करण्यात आली. तर २५ हजार रुपये दंड वसूल झाला.