रहिमतपुरात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:15+5:302021-04-07T04:41:15+5:30
रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवर विनामास्क फिरणाऱ्या व दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई ...
रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवर विनामास्क फिरणाऱ्या व दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून, ५० हजार ४०० रुपये वसूल केले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरासह जिल्हाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस दलही ठोस पावले उचलत आहे.
विनामास्क दुचाकींवर फिरून कोरोना विषाणूला आमंत्रण देणाऱ्या वाहन चालकांमुळे संसर्ग वाढत आहे, तसेच दुकानासमोर सोशल डिस्टन्स न ठेवल्याने गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत रहिमतपूर येथील गांधी चौक, बस स्थानक परिसर, चांदणी चौक, आदर्श शाळा चौक, कोरेगाव चौक आदी ठिकाणी फिरणाऱ्या २१२ वाहन चालकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे ४२ हजार ४०० रु. दंड वसूल केला, तर ८ दुकानदारांवरही कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ८ हजार रुपये दंड वसूल केला.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र, शासकीय आदेशाचे उल्लंघन केले जात असल्यामुळे दंडात्मक कारवाई केली जात आहे. अत्यंत गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना तोंडाला सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे, तसेच दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळून उभे राहावे. स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, अन्यथा शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला आहे.