गंभीर शस्त्रक्रिया करणा-या बोगस डॉक्टरांवर कारवाई
By admin | Published: September 13, 2016 06:55 PM2016-09-13T18:55:45+5:302016-09-13T18:55:45+5:30
पिंपोडे बुद्रुकमधील डी. एस. मंडल व डी. व्ही. पिंपोडकर या दोन बोगस डॉक्टरांविरोधात वाठार पोलिस ठाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रार दिली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
वाठार स्टेशन, दि. १३ - मूळव्याधीसारख्या गंभीर आजारावर गेल्या वीस वर्षांपासून शस्त्रक्रिया करणा-या पिंपोडे बुद्रुकमधील डी. एस. मंडल व डी. व्ही. पिंपोडकर या दोन बोगस डॉक्टरांविरोधात वाठार पोलिस ठाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रार दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. बीईएमएसची पदवी असताना हे शस्त्रक्रिया करत होते.
वाई हत्याकांडातील संतोष पोळ प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत बंगालमधील बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. त्यांनी दुस-याच डॉक्टराच्या नावे परवाने काढले असून, संबंधित बोगस डॉक्टर अघोरी कृत्य करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत माहिती अशी की, मूळव्याधीसारख्या आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टराबाबत अनेक तक्रारी वाढल्याने वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एम. पी. रायबोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व तालुका वैद्यकीय अधिका-यांच्या आदेशानुसार सोमवारी पिंपोडे बुद्रुक येथील शुभम क्लिनिकमध्ये आरोग्य केंद्रातील परिचर रमाकांत माळी यांना रुग्ण म्हणून पाठविले.
माळी यांची तपासणी करताना शासनाने नेमून दिलेले मार्गदर्शक तत्वे व नियमांचे पालन न केल्याचे निष्पन्न झाल्याने रायबोले यांनी डी. व्ही. पिंपोडकर व एस. एस. मंडल यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१ चे कलम ३३ व बॉम्बे नर्सिंग होम रजिस्टेशन कायदा १९४९ चे कलम ३ सह ६ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत वाठार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शासकीय रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर गेल्या २० वर्षांपासून हा उद्योग सुरू होता. तरीही आजवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
संतोष पोळ घटनेनंतर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बोगस डॉक्टरांबाबत कोणकोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागणार. दोन्ही बोगस डॉक्टरांवर काय कारवाई होणार याविषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नाही.