सातारा जिल्ह्यातील १८२३ ग्राहकांची बत्ती गुल!, महावितरणची कारवाई; तब्बल २२ कोटींची थकबाकी
By सचिन काकडे | Published: December 27, 2023 07:05 PM2023-12-27T19:05:03+5:302023-12-27T19:05:36+5:30
सातारा : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. या अंतर्गत ...
सातारा : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ हजार ८२३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, संबंधितांनी थकबाकी भरून तो पूर्ववत करावा, असे आवाहन महावितरणने केले अहे.
थकबाकीदारांकडून वीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने महावितरणने वसूली मोहीम गतीमान करण्याबरोबरच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांची थकीत रक्कम किती आहे? हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी केली जात आहे. यात परस्पर इतर ठिकाणावरून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ८६ हजार ग्राहकांकडे तब्बल २२ कोटी २ लाखांची थकबाकी असून, आतापर्यंत १ हजार ८२३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कसरत सुरू आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.