बसाप्पा पेठेतील अतिक्रमणावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:27+5:302021-03-06T04:37:27+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून शुक्रवारी बसाप्पा पेठेतील रस्त्याकडेला थाटण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात ही ...
सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून शुक्रवारी बसाप्पा पेठेतील रस्त्याकडेला थाटण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाल्याने टपरीधारकांनी कारवाईला कोणताही विरोध दर्शविला नाही.
सातारा शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. पालिकेकडून कारवाई केल्यानंतरही काही दिवसांत परिस्थिती पुन्हा जैसे थे होत आहे. बसाप्पा पेठ व मल्हार पेठ यांच्या हद्दीवर असणाऱ्या प्रतापसिंह शेती फार्मलगतच्या संरक्षक भिंतीलगत गेल्या काही महिन्यांपासून टपऱ्यांची रांग सुरू झाली आहे. याची संख्या वाढत चालल्याने वाहतुकीसाठी प्रशस्त असणारा राधिका रोड अरुंद होऊ लागला आहे.
या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्याने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या सूचनेवरून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी कारवाई मोहीम हाती घेतली. बसाप्पा पेठेकडून यशवंत हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन टपऱ्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आल्या. अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांचे पथक सकाळीच घटनास्थळी पोहोचले. येथील अतिक्रमण काढले जाणार असल्याची कुणकुण टपरीधारकांना आधीच होती. पोलीस बंदोबस्तात पालिकेने येथील दोन टपऱ्या हटविल्या.
फोटो : ०५ जावेद ०१
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी बसाप्पा पेठेतील रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या टपऱ्या हटविल्या. (छाया : जावेद खान)