काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई : ऊस मोजण्याचे वजनकाटे अचानकपणे तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:52 PM2019-12-24T23:52:36+5:302019-12-24T23:54:58+5:30
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
सागर गुजर ।
सातारा : साखर कारखान्यावर गाळपासाठी आणलेला ऊस कमी वजनाचा दाखवून काटामारी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वजनकाटे तपासण्यासाठी अकरा पथके तयार केली आहेत. ही पथके अचानक जाऊन कारखान्यावरील वजनकाट्यांची तपासणी करणार आहेत, तसेच दोषी आढळणाºया कारखान्यांवर कारवाईदेखील केली जाणार आहे.
जिल्ह्यात ऊस गाळपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी ऊसतोड आणि ऊस वाहतूक होताना पाहायला मिळते. कारखान्यापासून कमी अंतरातील ऊस हा बैलगाडीच्या माध्यमातून वाहून नेला जातो, तर जास्त अंतरातील ऊस हा ट्रॅक्टर-ट्रॉली अथवा ट्रकच्या माध्यमातून कारखान्यावर नेला जातो. कारखान्यावर ऊस गाळपाला निघण्याआधी या उसाची वाहने वजनकाट्यावर तपासली जातात. या वाहनांचे वजन वगळता त्यात असलेला ऊस जेवढ्या टनाचा आहे, त्याची नोंद होते. साहजिकच याठिकाणी नोंदवले गेलेले वजन हेच अंतिम असते. जितका ऊस आहे, त्याला टनाला जो दर दिला जातो, त्याचे गणित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जाते.
दरम्यान, साखर कारखान्यावर काटेमारी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. शेतकरी संघटनांची व कारखाना व्यवस्थापनांची बैठक नुकतीच जिल्हा प्रशासनाने घेतली होती. या बैठकीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कारखाने कशाप्रकारे काटेमारी करतात, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
तसेच जिल्हा प्रशासन नेहमीप्रमाणे वजनकाटे तपासणीचे पथक नेमते, मात्र हे पथक संबंधित कारखान्यांना आधीच सूचना करून त्याठिकाणी तपासणी करण्यासाठी जाते. साहजिकच साखर कारखान्यांना याची माहिती आधीच मिळत असल्याने जे योग्य प्रमाण आहे, असे वजन काटे दाखवले जातात आणि त्याची तपासणी योग्य असल्याचा रिपोर्ट संबंधित पथकाकडून प्रशासनाला दिला जातो. ही बाब शेतकºयांसाठी अन्यायकारक अशीच असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नेमलेली पथके अचानकपणे जर साखर कारखान्यांवर धाडली केली तर नेमकी बाब पुढे येऊ शकते, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
ही पथके अचानकपणे कारखान्यांवर धाडी टाकतील. काट्यांची तपासणी केल्यानंतर जर ते अयोग्य अथवा त्यात बोगसगिरी आढळल्यास ते काटे सील केले जाणार आहेत.
- ऊस वाहतुकीचा खर्च वेगळा
प्रत्येक साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. त्या कार्यक्षेत्रामध्ये असलेला ऊस गाळप झाल्यानंतर गेट केनचा ऊस आणला जातो. मात्र प्रत्येक कारखान्याचा एकाच किलोमीटरमधील ऊस वाहतुकीचा खर्च वेगवेगळा दिसतो. हा खर्च शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून परस्पर वसूल केला जात असतो, त्यामुळे हा खºया खर्चाबाबत साखर कारखान्यांनी पारदर्शक पारदर्शकता ठेवायला हवी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या तहसीलदारांना वजनकाटे तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. साखर कारखान्यांकडील वजनकाटे सुस्थितीत ठेवावेत, ही कारवाई कुठल्याही क्षणी होऊ शकते.
- रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी