विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:15+5:302021-01-25T04:39:15+5:30

सातारा : महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ...

Action if student is denied scholarship | विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई

Next

सातारा : महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ व २०१९-२० मधील मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम आधारकार्ड अद्ययावत नसणे, तसे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याकारणाने शिष्यवृत्ती मंजूर होऊनसुद्धा प्रलंबित आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी‍ विद्यार्थ्यांकडून आधारकार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून या कार्यालयाकडे मंजुरीसाठी तत्काळ पाठवावेत, अशा सूचना सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिल्या.

जिल्ह्यातील ३५१ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सन २०१९-२० मधील एकूण ३०३३ विद्यार्थ्यांचे अर्ज दुसऱ्या हप्त्यासाठी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या हप्त्याची रक्कम विद्यार्थी, महाविद्यालये यांच्या खात्यावर वर्ग होणार नाही. त्यासाठी महाविद्यालयांनी दुसऱ्या हप्त्यासाठी ॲप्लाय करण्याची कार्यवाही तत्काळ करावी. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. ३ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आहे. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावेत. महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी सांगितले.

Web Title: Action if student is denied scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.