अंगापूरमध्ये नियमबाह्य उघड्या दुकांनावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:13+5:302021-04-09T04:41:13+5:30
अंगापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. याची शहर व गावपातळीवर योग्य ती ...
अंगापूर :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. याची शहर व गावपातळीवर योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी बाजार पेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता नियमबाह्य उघड्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी व्यावसायिक व प्रशासनात तू-तू मैं-मैं होऊन वाद-विवादाचे चित्र निर्माण झाले होते.
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने नियमावली लागू केली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी व जिल्हा प्रशासनानाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उघडण्यात आला. या कारवाईत सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, ग्रामविकास अधिकारी आत्माराम पवार, तलाठी पी. एस. माने, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कणसे, मच्छिंद्रनाथ नलवडे, नवनाथ गायकवाड व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईची सुरुवात होताच बाजार पेठेतील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकानदाराने आपली दुकाने पटापटा बंद केली. तर काही दुकानदार व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात तू-तू-मैं-मैं होऊन वाद- विवादाचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाईवर ठाम राहिल्याने जवळपास दहा ते बारा नियमबाह्य दुकानांवर दंडात्मक कारवाई करून या दुकानदारांना समज देण्यात आली. त्यानंतर मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अंगापूरच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद झाल्याने शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या या कारवाईचे सामान्य नागरिकांनी कौतुक केले असले तरी व्यावसायिक मात्र नाराजी व्यक्त करीत होते.
प्रतिक्रिया.....
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जनतेने प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक करवाई टाळावी.
-आत्माराम पवार,
ग्रामसेवक, अंगापूर वंदन
०८अंगापूर
अंगापूर येथे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य नियमबाह्य दुकानांवर कारवाई करताना ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी.